बेळगावमध्ये 1924 मध्ये झालेल्या अधिवेशनाला उपस्थित न राहण्याचा सल्ला काही लोकांनी गांधीजींना दिला होता तथापि बेळगाव परिसरातील स्वातंत्र्यलढ्याला नवी उत्तेजना देण्यासाठी गांधीजींनी अधिवेशनाला हजर रहावे असे गंगाधरराव देशपांडे यांना वाटत होते. बेळगावमध्ये 1924 साली म. गांधीजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या स्मरणार्थ वीर सौध हे स्मारक बांधण्यात आले आहे.
महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम 1916 मध्ये बेळगाव शहराला भेट दिली होती. त्यानंतर 1924 च्या काँग्रेस कमिटी अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविण्यासाठी ते बेळगावला आले होते. वीर सौधच्या पूर्वी रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेल्या फलकावर देशाच्या स्वातंत्र्याचा लढा जेंव्हा चरम सीमेला पोहोचला होता. त्यावेळी गांधीजींनी बेळगावला दिलेल्या भेटींची नोंद आहे. बेळगाव येथे 29 एप्रिल 1916 ते 1 मे या कालावधीत बॉम्बे प्रांतीय परिषद झाली. तेंव्हा गांधीजींनी काँग्रेस संविधान 1915 च्या अनुच्छेद 20 मधील दुरुस्तीनुसार देशातील राजकीय पक्षांमधील तडजोडीच्या ठरावाला पाठिंबा दिला होता.
त्यानंतर 30 एप्रिल 1916 मध्ये म. गांधीजींनी बेळगावमध्ये ‘देशातील उदासीन वर्ग’ यावर भाषण दिले होते. 18 डिसेंबर 1924 रोजी ते अहमदाबादहून बेळगावला रवाना झाले आणि 20 डिसेंबर रोजी बेळगावात पोहोचले. त्यानंतर 21 डिसेंबर रोजी त्यांनी बेळगाव नगरपालिका आणि जिल्हा बोर्डाने केलेल्या त्यांच्या स्वागताला उत्तर दिले. बेळगावमध्ये एआयसीसीने म. गांधीजींच्या अध्यक्षतेखाली आपल्या अंतर्गत विषय समिती स्थापन केली आणि कलकत्ता कराराला मान्यता देण्याकरिता ई3 मसुदा तयार करण्यासाठी 16 जणांची उपसमिती स्थापन केली. बेळगाव मधील विषय समितीच्या बैठकीत गांधीजींनी भूमिका न बदलणाऱ्या स्वराज्यवाद्यांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. दुसऱ्या दिवशी 26 डिसेंबर रोजी महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 39 व्या अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात गांधीजींनी कलकत्ता कराराला मान्यता देण्यावर आपले विचार व्यक्त केले.
बेळगावमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी रोडवरील शिवाजी उद्यानाच्या शेजारी देखील गांधी स्मारक आहे. 1937 मध्ये महात्मा गांधीजी बेळगाव पासून 25 कि. मी. अंतरावर असलेल्या हुदली या गावात आठवडाभरासाठी वास्तव्यास होते. त्यावेळी गांधीजीं समवेत सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, राजेंद्र प्रसाद, खान अब्दुल गफार खान आणि कस्तुरबा गांधी यांच्यासारखे नेते देखील हुदलीला आले होते.
आत्मनिर्भरतेच्या गांधीवादी विचारधारेने प्रेरित झालेल्या हुदलीच्या रहिवाशांनी आज खादी उद्योगाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. स्वातंत्र्य सेनानी कर्नाटक केसरी गंगाधरराव देशपांडे यांनी गांधीजींना हुदली येथे आणले आणि हे गाव खादी ग्रामामध्ये परिवर्तित झाले. तेंव्हापासून या गावाने खादी उत्पादनात गती प्राप्त केली आहे. त्यावेळी गांधीजींना आणण्यासाठी सुळधाळ रेल्वे स्थानकावर बैलगाडीची सोय करण्यात आली होती. मात्र ती सुविधा नाकारून महात्मा गांधीजी आपल्या अनुयायांसमवेत सुळधाळहून हुदलीपर्यंत पायी चालत आले होते.
हुदली येथे 1954 मध्ये खादी ग्रामोद्योग उत्पादक संघाची (केजीयुएस) स्थापना झाली. तत्पूर्वी 1927 मध्ये गांधीवादी गंगाधरराव देशपांडे यांनी हुदली नजीकच्या कुमारी आश्रम येथे खादी केंद्राची सुरुवात केली होती. जे कर्नाटकातील पहिले खादी केंद्र होते. यासाठी देशपांडे यांना ‘कर्नाटकचे खादी भगीरथ’ ही पदवी देण्यात आली. त्या काळात गंगाधरराव गाडगीळ यांनी गावोगावी फिरून खादी चळवळीबाबत जनजागृती केली. त्यांचे हे कार्य पुंडलिकजी कातगडे यांनी पुढे अविरत सुरू ठेवले. महात्मा गांधीजींच्या रक्षा मुगुटखान हुबळी येथे दफन करण्यात आल्या आहेत.