बेळगाव लाईव्ह :शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे दसरा व नवरात्रीनिमित्त आयोजित श्री दुर्गामाता दौडला आज रविवारपासून नेहमीप्रमाणे अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. तरुणांना एकवटून त्यांच्यामध्ये देव, देश व धर्म यांचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या यंदाच्या रौप्य महोत्सवी श्री दुर्गामाता दौडमध्ये आज सोमवारी पहिल्या दिवशी शेकडो युवक -युवती व शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला होता.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या श्री दुर्गामाता दौडचे यंदाचे हे 25 वे वर्ष आहे. नवरात्रीत सलग नऊ दिवस दररोज सकाळी आयोजित केल्या जाणाऱ्या या दौडची आजच्या पहिल्या दिवशी शहापूर येथील छ. शिवाजी उद्यानापासून सुरुवात झाली. यासाठी पहाटे 5 वाजल्यापासून शिवभक्त जमायला सुरुवात झाली होती. उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीसमोर प्रेरणा मंत्र व आरती झाल्यानंतर शिवरायांच्या जयजयकारासह हर हर महादेव घोषणा देत श्री दुर्गामाता दौड सुरू झाली.
दौडच्या अग्रभागी भगवा ध्वज हाती घेतलेला शिवभक्त होता आणि त्याच्या मागोमाग शस्त्रपथक, ध्वजपथक, भगवे फेटेधारी आणि शेकडो शिवभक्त होते. डोक्यावर पांढरी गांधी टोपी अथवा भगवे फेटे परिधान करून दौडमध्ये सहभागी झालेले धारकरी, युवक -युवती आणि शिवभक्त साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
छ. शिवाजी उद्यान येथून प्रारंभ झालेली आजची श्री दुर्गामाता दौड हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, एसपीएम रोड, संत सेना रोड, पाटीदार भवन रोड, शास्त्रीनगर, गुडशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, आठल्ये रोड, महाद्वार रोड चौथा क्रॉस, माणिकबाग रोड, समर्थनगर, महाद्वार रोड तिसरा व दुसरा क्रॉस, संभाजी गल्ली, एसपीएम रोड मार्गे श्री कपिलेश्वर मंदिर येथे समाप्त झाली. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्यासह विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशराम कोकितकर आदी उपस्थित होते.
आजच्या दौडचे ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे औक्षण करण्याबरोबरच स्वागत फलक उभारून तसेच रस्त्यावर रांगोळी काढून, फुलांची आरास करून स्वागत करण्यात येत होते. काही ठिकाणी बालचमू पारंपरिक वेशात दौडीच्या स्वागतासाठी उभा असलेला पहावयास मिळत होता.
प्रत्येक मार्गावर दौडचे उस्फूर्त स्वागत केले जात होते. श्री दुर्गामाता दौड सुरळीत पार पडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता उद्या
सोमवारी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी गणेश मंदिर चन्नम्मा सर्कल येथून दौडला प्रारंभ होणार असून श्री दुर्गादेवी मंदिर किल्ला येथे सांगता होणार आहे.
केवल बेळगाव शहरातच नव्हे तर आजूबाजूच्या ग्रामीण भागातील प्रत्येक गावात देखील रविवारी दुर्गामाता दौड ला उत्साहात सुरुवात झाली. बेळगाव खानापूर सह सीमा भागात नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच्या दुर्गामाताचा उत्साह अमाप होता.