बेळगाव लाईव्ह : बेळगावने भारताला चार ऑलिंपिक हाॅकी खेळाडू दिले परंतु कर्नाटक शासनाने बेळगावसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाॅकी मैदान अद्याप दिलेले नाही तसेच बुडाच्या सर्व साधारण बैठकीत 2020 मध्ये कणबर्गी येथे 8 एकर जागा मंजुरीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे परंतु यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने हाॅकी बेळगाव संस्थेची ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी पूर्णत्वास न्यावी अशी मागणी नगरविकास मंत्री भैरत्ती सुरेश यांच्याकडे करण्यात आली आहे.
नगरविकास मंत्र्याच्या बेळगाव भेटी दरम्यान हॉकी संघटनेचे पदाधिकारी विकास कलघटगी यांनी अश्या आशयाचे निवेदन दिले.
मंत्री बी एस सुरेश यांनी ॲस्ट्रोटर्फ हाॅकी मैदानाची प्रलंबित मागणीची त्वरित पूर्तता करण्याचे आश्वासन बेळगाव हाॅकी पदाधिकाऱ्यांना सुवर्ण विधान सौध सभागृहात दिली.यावेळी आमदार राजू सेठ यांनीही मंत्री महोदयांना ॲस्ट्रोटर्फ हाॅकी मैदानाची प्रलंबित मागणीची त्वरित पूर्तता करावी अशी विनंती केली.
.
बेळगांव हे हाॅकी प्रेमींचे माहेर घर आहे. आज जिल्ह्यात 500 हून अधिक खेळाडू हाॅकीचा नित्यनेमाने सराव करीत आहेत, परंतु ॲस्ट्रोटर्फ मैदानाची कमतरता असल्याने बेळगावातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे अशी माहिती सचिव सुधाकर चाळके यांनी मंत्र्यांना सांगितली.
यावेळी नगर प्रशासन मंत्री रहीम खान, नगर प्रशासन खाते संचालिका एल मंजुश्री, आमदार विश्वास वैद्य, आमदार गणेश हुक्केरी, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंडी, सचिव सुधाकर चाळके, प्रकाश कालकुंद्रीकर आदी उपस्थित होते.
शुक्रवारी भारतीय हॉकी संघाने आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले असताना देशात हॉकीला चालना देण्यासाठी खेडोपाड्यात हा खेळ पोचवण्यासाठी सुसज्ज मैदानांची गरज आहे त्याची पूर्तता राज्य सरकारने करणे गरजेचे आहे.