बेळगाव लाईव्ह :केंद्रीय पाहणी पथकाच्या दौऱ्यानंतर अखेर राज्य सरकारने बेळगाव आणि खानापूर दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त झाला आहे.
बेळगाव, खानापूर झाली घोषणा
बेळगाव खानापूर दोन्ही तालुके दुष्काळ घोषित करा अशी अनेकांनी मोर्चे निवेदने देत मागणी केली होती शेतकरी या मागणीसाठी आक्रमक झाले होते अखेर राज्य शासनाने ही घोषणा करत बेळगाव आणि खानापूर तालुक्याला दिलासा दिला आहे.
राज्य सरकारने १४ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या दुष्काळाच्या घोषणेत जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले होते. बेळगाव आणि खानापूर या दोन्ही तालुक्यांना दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरमो र्चाही काढला होता. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी त्यानतंर बेळगाव आणि खानापूर तालुक्यांची पाहणी करून सरकारला वेगळा प्रस्ताव पाठवला होता.
गेल्या आठवड्यात अजितकुमार साहू यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आले होते. या पथकाने सौंदत्ती, बैलहोंगल, हुक्केरी तालुक्यातील गावांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळीही बेळगाव आणि खानापूर जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची माहिती देण्यात आली होती. जिल्हाधिकारी पाटील आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी त्यांच्याकडे पाठपुरावा केला.
अखेर राज्य सरकारने सोमवारी बेळगाव आणि खानापूरलाही दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केले. राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘राज्यात हरित दुष्काळ पडला आहे. पिकांची पुरेशी वाढ झाली नाही. त्यामुळे फळधारणा झाली नसल्यामुळे उत्पादनाता मोठी घट होणार आहे. ऐन पेरणीच्या वेळी तीन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे.’
दुष्काळी यादीत २१ तालुक्यांची भर राज्य सरकारने याआधी राज्यातील १९३ तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर केले होते. पण, केंद्रीय पाहणी पथक येऊन गेल्यानंतर आता पुन्हा २१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. त्यामध्ये बेळगाव आणि खानापूरचा समावेश आहे.