बेळगाव लाईव्ह :बेळगाव विभागातील व्यावसायिक कर खात्याच्या संयुक्त आयुक्त श्रीमती दक्षायनी चौशेट्टी यांना लोकायुक्त पोलिसांनी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. त्यामुळे संबंधित खात्यात खळबळ उडाली आहे.
ऑटोनगर येथील विकास कंपोझिट कंपनीचे व्यवस्थापक विकास प्रमोद कोकणे यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार कोकणे यांच्या तक्रारीनुसार श्रीमती चौशेट्टी यांनी जीएसटी अपीलसाठी रेक्टिफिकेशन ऑर्डर मंजूर करण्यासाठी 25,000 रुपयांची लाच मागितली होती.
याप्रकरणी निरंजन एम. पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकायुक्त पोलीस पथकाने तपास कार्य हाती घेऊन शहानिशा केली.
त्यानंतर सापळा रचून व्यावसायिक कर संयुक्त आयुक्त श्रीमती दक्षायनी चौशेट्टी यांना कलंकित पैसे स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून लोकायुक्त पोलीस अधिक तपास करत आहेत.