बेळगाव लाईव्ह :महापालिकेने घरपट्टीत वाढ केली नसल्यामुळे नगरप्रशासन संचनालयाने महापालिका का बरखास्त करू, अशी कारणे दाखवा नोटिस पाठवल्यामुळे महापालिकेच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
त्यामुळे सोमवारी सत्ताधारी गटाने नोटीशीला उत्तर दिले आहे.त्यांनी बंगळूरला धाव घेतली होती.सत्ताधारी भाजप गटनेते राजशेखर डोणी यांच्यासह काही नगरसेवकांनी नगरप्रशासन संचनालयाच्या संचालकांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी 16 सप्टेंबर रोजी महापालिका सभागृहात करण्यात आलेल्या ठरावाची प्रत आणि 2021 पासूनची कागदपत्रे त्यांच्याकडे दिली. त्यामुळे आता महापालिकेने कारणे दाखवा नोटीशीला उत्तर दिले आहे.
बेळगाव मनपा बरखास्तीची कारवाई टाळण्यासाठी नगरसेवकांकडून धावाधाव करण्यात येत आहे. महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील ही मात्र बंगळूर येथे गेले नव्हते, असे समजते.
शुक्रवारी महापौरांनी आपल्या कक्षात सत्ताधारी नगरसेवकांची बैठक घेतली होती. त्यानंतर सत्ताधारी गटनेत्यांनी आपल्या कक्षात सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांची एकत्र बैठक घेऊन कारणे दाखवा नोटीशीला उत्तर देण्याचा निर्णय घेतला होता.
त्यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, नगरप्रशासन मंत्री भैरती सुरेश, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरले होते. पण, नगरप्रशासन संचनालयाला आज कागदपत्रे सुपुर्द करण्यात आली आहेत.
या अगोदर बेळगाव मनपा मराठी कन्नडच्या मुद्द्यावर दोनदा मनपा बरखास्त झाली होती मात्र आता विकासाच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच बरखास्तीची नोटीस बजावण्यात आली आहे.