बेळगाव लाईव्ह :नवरात्री सणानिमित्त उभारण्यात आलेली स्वागत कमान हटवण्यास आलेल्या पोलीस व महापालिका कर्मचाऱ्यांना श्रीराम सेना हिंदुस्तानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे कांही काळ तणाव निर्माण झाल्याची घटना काल रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास अनगोळ नाका येथे घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, नवरात्रोत्सवासाठी अनगोळ नाका येथे श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेच्यावतीने भव्य स्वागत कमान उभारण्यात आली आहे. ही कमान हटविण्यासाठी काल मंगळवारी रात्री महापालिकेचे महसूल व अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी अनगोळ नाका येथे गेले होते.
त्या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता. तथापि स्वागत कमान हटविण्यासाठी पोलीस व महापालिका कर्मचारी आल्याची माहिती मिळताच श्रीराम सेना हिंदुस्तानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने अनगोळ नाका येथे जमा झाले आणि त्यांनी कमान हटवण्यास तीव्र विरोध केला. त्यामुळे कार्यकर्ते आणि महापालिका कर्मचारी यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाली.
अखेर कार्यकर्त्यांच्या प्रचंड विरोधामुळे रात्री 11 वाजता अनगोळ येथील स्वागत कमान हटवण्याची कारवाई रद्द करून महापालिका कर्मचाऱ्यांना हात हलवत माघारी फिरावे लागले. मात्र यामुळे परिसरात कांही काळ तणाव निर्माण झाला होता.
याव्यतिरिक काल सायंकाळी शनी मंदिर येथे देखील नवरात्रीनिमित्त लावण्यात आलेले होर्डिंग हटविण्यास विरोध करण्यात आला. त्या विरोधामुळे तेथील कारवाई महापालिकेला थांबवावी लागली होती.
त्यावेळी ठराविक होर्डिंगच का हटविले जात आहेत? असा सवाल कार्यकर्त्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना विचारला असता ते निरुत्तर झाल्याचे दिसून आले. स्थानिक नगरसेवकही या संदर्भात आक्रमक झाल्यामुळे शनी मंदिर येथून महापालिका कर्मचाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला.