Wednesday, April 17, 2024

/

नितीन देसाईंचे जाणे चटका लावणारे

 belgaum

बेळगाव लाईव्ह:नितीन मुरारी पडियार- देसाई. बेळगावच्या फळ बाजारातील एक अग्रणी नाव. फ्रूट मार्केट असोशियशनचे माजी अध्यक्ष आणि फळांचा राजा हापूस बेळगावकरांना सर्वात प्रथम चाखविण्यासाठी जीवापाड झटत राहिलेले नाव. हे व्यक्तिमत्व अचानक काळाच्या पडद्या आड हरविले गेले…. त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे तर त्यांच्याशी संबंधित सर्वांसाठीच हा प्रसंग चटका लावणारा ठरला आहे.

नितीन देसाई म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व. मित्रांची संख्या प्रचंड. एम बी देसाई अँड सन्स ही वडील मुरारी देसाई यांनी सुरू केलेली फर्म वाढविण्यात आणि विस्तार करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे.

कडोलकर गल्लीच्या अडचणीत अडकलेला फळ व्यवसाय गांधीनगर जवळ स्वतंत्र फ्रूट मार्केट मध्ये नेण्यात मुरारी देसाई यांचे योगदान मोठे आहे. पुढाकार घेऊन त्यांनी असोसिएशनच्या इतर सर्व सदस्यांच्या साथीने फ्रूट मार्केट उभारले. नितीन यांनी वडिलांनी आखून दिलेल्या याच पायवाटेवरून मार्गक्रमण केले. वडिलांना अपेक्षित असलेल्या योजना साकारण्यासाठी अध्यक्ष बनून त्यांनी नेतृत्व स्वीकारले आणि अनेक वर्षे सांभाळले.

 belgaum

तरुण वयातच या व्यवसायात आल्यावर आपल्या अनेक कल्पना त्यांनी राबविल्या. सुरुवातीला विदेशी फळांची आयात त्यांनी सुरू केली. आंबा व्यापार पूर्वापार होताच. मात्र कुडाळ, सावंतवाडी, रत्नागिरी आणि मालवण भागातील बागायतदारांची इतर मार्केट मध्ये होणारी फसवणूक रोखण्याचा वसा त्यांनी घेतला. दर्जेदार हापूस बेळगावात सर्वप्रथम उपलब्ध करीत त्यांनी चाहत्यांची सोय केलीच आणि कोकण वासियांना हक्काचे आणि विश्वासाचे मार्केट म्हणून एक विश्वास दिला.Nitin desai

कोरोनाचा दोन वर्षे काळ महाकठीण होता. आंतरराज्य वाहतूक बंद होती. कोकणात तयार होणारा हापूस तेथेच पडून सडून जाण्याचा धोका मोठा होता. नितीन यांनी आपले बंधू संदीप यांच्या साथीने रात्र रात्र जागून तो आंबा बेळगावला आणला. दिवसभर तो बेळगावात घरोघरी पोचवला. फायदा पाहिला नाही, लाखोंचे नुकसान सोसले, पण बागायतदार मरता कामा नये, या भावनेने ते काम करीत राहिले. प्रचंड लॉकडाऊन असतानाही ते झटत राहिले, हे विसरता येणार नाही. म्हणूनच आजही कोकणातील आंबा उत्पादक त्यांना देव मानतात. कोरोना नंतर अनेक भागात त्यांना बोलावून शेतकऱ्यांनी त्यांचे सत्कार केले आहेत.

नितीन देसाई यांनी सर्व क्षेत्रात आपले मित्र जोडले. मोठे व्यापारी असले तरी त्यांची नाळ तळागाळातील व्यक्तींशी जास्त जुळलेली होती. अनेकांना त्यांनी मदत केली आहे, मात्र या कानाचे त्या कानाला कळू न देता. अडचणीत असलेल्या माणसाला उभे करणे त्यांना आवडायचे. कधीही हाक मारा ते धाऊन जायचे. माणसाने ताण घेऊन जगण्यात अर्थ नाही, नेहमी राबा आणि कमवा…. हसत हसत जगा… असे ते सांगायचे. कामाच्या गडबडीत कुटुंबाकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही, याची त्यांना कायम खंत असायची… पण मुलाबाळांच्या प्रगतीत ते सुखाऊन जायचे.

फ्रूट मार्केटवर येणाऱ्या अनेक समस्या कुणालाही कल्पना येऊ न देता ते दूर करीत राहिले. होलसेल वाल्यापासून किरकोळ विक्री करणाऱ्या फळ विक्रेत्यापर्यंत कुणालाही कसलाही त्रास होऊ नये, म्हणून झटत राहिले. दुर्दैव हे की एक साध्या आजाराचे निमित्त होऊन चटकन निघूनही गेले. आज त्यांचे कुटुंब दुःखात आहेच, पण त्यांना ओळखणारा आणि त्यांच्या कार्याची प्रचिती असणारा प्रत्येकजण हळहळतोय….. जीवन क्षणभंगुर आहे, पण नितीन सावकार इतक्या लवकर जायला नको होते…. हीच सर्वांची भावना आहे. आपल्या 49 वर्षांच्या जीवन काळात नितीन देसाई यांनी मिळविलेली ही कमाई मोठी आहे. त्यांच्या बद्दलची हीच जनभावना त्यांच्या कुटुंबाला पुढील काळात वाटचाल करताना महत्वाची ठरणार आहे.

– एक परिचित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.