बेळगाव लाईव्ह :राज्यात संपूर्ण दुष्काळ जाहीर करण्यात यावा. शेतकऱ्यांच्या किमान 7 तास सुरळीत वीजपुरवठा केला जावा. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्याची वसुली थांबवावी अशा विविध मागण्या नेगील योगी रयत सेवा संघातर्फे एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे करण्यात आल्या आहेत.
नेगील योगी रयत सेवा संघाचे राज्याध्यक्ष रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून अंतिम निर्णयासाठी ते सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. पावसाअभावी यावर्षी संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरेसा पाऊस न झाल्यामुळे शेतीच्या हंगामांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
पाऊस नसल्यामुळे तसेच अवेळी झालेल्या पावसामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. तथापि राज्य सरकार मात्र शेतकरी आणि शेतमजुरांच्या शोचनीय वर्तमान परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या गॅरंटी योजना राबवण्यात गर्क आहे. विरोधी पक्ष देखील सत्तेवर येण्यासाठी आगामी निवडणुकीची तयारी करण्यामध्ये व्यस्त आहे. याउलट संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपल्या व आपल्या कुटुंबाच्या भवितव्याची चिंता लागून राहिली आहे.
तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ पावले उचलावीत. तसेच आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशा आशयाच्या तपशीलासह राज्यातील कृषी आणि बागायत क्षेत्राचे पावसाअभावी नुकसान झाले आहे. त्यामुळे काही ठराविक प्रदेश दुष्काळग्रस्त घोषित न करता संपूर्ण राज्यात दुष्काळ घोषित करावा.
शेतकऱ्यांना प्रति एकर 25 हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करावी. जनावरांसाठी चारा -पाण्यासह आवश्यक गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात. शेतातील पाण्याच्या पंप सेटना किमान 7 तास सुरळीत वीजपुरवठा केला जावा. विद्युत विभागाचे खाजगीकरण करू नये. बँका, सहकारी संघ, कृषी भूअभिवृद्धी बँक, खाजगी फायनान्स कंपन्या या सर्वांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली थांबवून त्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले जावे. पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहेत.
निवेदनावर नेगील योगी रयत सेवा संघाचे राज्याध्यक्ष रवी पाटील, बेळगाव तालुकाध्यक्ष अण्णाप्पा पाटील, बैलहोंगल तालुका अध्यक्ष शिवप्पा कुरी, यल्लाप्पा तळवार आदींच्या स्वाक्षऱ्या असून निवेदन सादर करतेवेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.