बेळगाव लाईव्ह: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,निर्विघ्न कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणेश भक्तांसाठी अष्टविनायक हे एक गणेश भक्तांच्या मनामनात कोरलेले श्रध्देचे स्थान आहे. अष्टविनायकाच दर्शन म्हणजे गणेश गणेश भक्तांची वारी आहे. अष्टविनायकाची दर्शन करून त्यांची रूपे मनात साठवावी किंबहुना आपणच गणेश मय होऊन जावे ही श्रध्देची अलौकिक पातळी भक्तांना दर्शनाला घेऊन जाते.
पौराणिक ऐतिहासिक आणि श्रध्देचा वारसा लाभलेली ही अष्टविनायकाची ठिकाणे म्हणजे भाव बंदातील भक्तिरसाचा खजिनाच!
अष्टविनायकाच्या ठिकाणीच्या मातीची धूळ लालाठी लाऊन गणेशमय व्हावे हाच श्रध्देचा परमोच्च बिंदू..धार्मिक सहली अंतर्गत या अष्टविनायकांचे दर्शन स्मिता चिरमोरे केले आणि त्याची माहिती मांडली आहे आपल्या लेखनीतून..
आता आपण “गणपती बाप्पा मोरया” म्हणून सुरुवात करूया. मी प्रथम गणपती बाप्पास नमन करून आपणास अष्टविनायकाची महती सांगण्याचा प्रयत्न करते. श्री गणेशाचे स्वयंभू व जागृत आठ सिद्धक्षेत्र ज्याला आपण अष्टविनायक म्हणतो त्या क्षेत्राचा क्रम पुढीलप्रमाणे आहे.
१. प्रथम क्षेत्र– श्री मयुरेश्वर, मोरगाव.
२. द्वितीय क्षेत्र -श्री सिद्धिविनायक ,सिद्धटेक.
३. तृतीय क्षेत्र- श्री बल्लाळेश्वर, पाली.
४. चौथे क्षेत्र–श्री वरदविनायक, महड.
५. पाचवे क्षेत्र -श्री चिंतामणी, थेऊर.
६. सहावे क्षेत्र- श्री गिरीजात्मक, लेण्याद्री.
७. सातवे क्षेत्र -श्री विघ्नहर ,ओझर.
८. आठवे क्षेत्र -श्री महागणपती, रांजणगाव.
हा आहे अष्टविनायक क्रम. असे म्हणतात की याप्रमाणे आठ पिठांचे दर्शन घ्यावे पण हे शक्य होत नाही कारण आपण कोठून सुरुवात करतो यावर ठरले जाते. आम्ही सर्व मैत्रिणी बेळगाव पासून सुरुवात केल्यामुळे हा क्रम मात्र थोडा पुढे पाठीमागे झाला.. पण मी मात्र ही माहिती सांगत असताना संपूर्णतः क्रमाने सांगण्याचा प्रयत्न करते. हे अष्टविनायकाचे दर्शन आपण दोन ते तीन दिवसात पूर्ण करू शकतो. तुम्ही देखील कोणतीही गडबड न करता निवांत प्रवास करून हे दर्शन करावे म्हणजे खूप बरे वाटते व व्यवस्थित होते.
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची!
नुरवी पूरवी र्प्रेम कृपा जयाची!
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची!
कंठी झळके माळ मुक्ताफळांची!
जय देव जय देव जय मंगलमूर्ती!
दर्शन मात्रे मन.: कामना पूर्ती!
खरेच आपण कुठल्याही कामाची सुरुवात करत असता प्रथम गणपती पूजनाने सुरुवात करतो .पण जी आरती आपण दररोज म्हणतो व ऐकतो ती आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी श्री मयुरेश्वराचे दर्शन घेत असताना रचली आहे .गणपती बाप्पा आपल्या सर्वांसाठी खूप जवळचा व आदरणीय आहे. आपण सर्वजण त्यास विघ्नहर्ता म्हणून ओळखतो ,तसेच बुद्धी आणि शहाणपणाचा देव म्हणून देखील गणपती प्रसिद्ध आहेच. श्री भगवान शंकर व पार्वती पुत्र ‘गणपती ‘ही बुद्धीची देवता आहे. प्रत्येक शुभकार्यात गणपतीची पूजा केली जाते हे आपणास माहित आहेच. तसे पाहिले गेले तर….
गणपतीचे वाहन —उंदीर.
गणपतीचे शस्त्र- –पाश ,अंकुश परशु ,दंत.
गणपतीची पत्नी —ऋद्धी आणि सिंद्धी
गणपतीचे अपत्य- —शुभ, लाभ
गणपतीचे मंत्र—– ॐ गँ गणपतये नम:
गणपतीचे तीर्थक्षेत्र—- -अष्टविनायक.
. आणि म्हणूनच मी आपणास ह्या अष्टविनायकाची माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. जी माहिती मला अष्टविनायकचे दर्शन घेत असता त्या त्या देवळामध्ये मिळाली ती मी आपणास माझ्या लिखाणाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करते.खरं तर हे महाराष्ट्रातील आठ मानाची देवळे आहेत पश्चिम महाराष्ट्र व कोकणात ह्या आठ म्हणजेच अष्टविनायकाचा एक स्वतंत्र इतिहास आहे . ह्या देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्याकारणाने पेशवाईच्या काळात खूप महत्त्व प्राप्त झाले. चला तर आता ह्या क्षेत्रांची महती पाहू.
प्रथम क्षेत्र- श्री मयुरेश्वर, मोरगाव—-
हे महाराष्ट्रातील साडेतीन गणेश पीठांपैकी आद्यपीठ आहे. श्री मयुरेश्वर यांची महती अशी की भृशृंडी ऋषींच्या सांगण्यानुसार ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती व सूर्य या पाच देवतांनी येथे अनुष्ठान करून गणेशपिठाची स्थापना केली .या स्थानी गणेशाने मोरावर बसून सिंधू व कमलासूर या दैत्यांचा संहार केला .त्यावेळी मोर हे गणेशाचे वाहन होते आणि म्हणून गणेशास मयुरेश्वर असे संबोधले गेले . ह्या मंदिराची उभारणी ब्रह्मदेवांनी केली. तसेच मंदिराच्या प्रवेश स्थानात एक भव्य दगडी उंदीर व नंदी आहे . गणेश उपासक श्री मोरया गोसावी यांचे हे जन्मस्थान असून कन्हा नदीच्या पात्रात त्यांना गणेश मूर्ती सापडली व ती त्यांनी चिंचवड येथे प्रतिष्ठापना केली.
द्वितीय क्षेत्र— श्री सिद्धिविनायक ,सिद्धटेक.
श्री सिद्धिविनायक इथे श्री गणेश मूर्तीची स्थापना श्री भगवान विष्णू यांनी केली. ही आराधना मधु व कैटभ यांचा वध करण्यासाठी केली होती. तसेच श्री भगवान विष्णू यांना येथे सिद्धी प्राप्त झाली म्हणून या विनायकाला सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक म्हटले जाते. एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे.. येथील भीमा नदी ही दक्षिण वाहिनी असून या प्रवाहास अतिशय पवित्र मानले जाते. येथे नदीला कितीही पूर आला तरी नदीच्या प्रवाहाचा आवाज या परिसरात येत नाही. हे आहे या नदीचे वैशिष्ट्य. आहे की नाही देवाची करणी…
ही सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ही एकमेव मूर्ती उजव्या सोंडेची आहेत म्हणून यास सिद्धिविनायक असे देखील म्हटले जाते आणि त्यामुळेच ह्या उजव्या सोंडेच्या गणेशाचे सोवळे फार कडक आहे.
तृतीय क्षेत्र —श्री बल्लाळेश्वर, पाली.
या क्षेत्राला भव्य किल्ल्याची व आंबा नदीच्या प्रवाहाची पार्श्वभूमी लागली आहे .एक महत्त्वाची गोष्ट अशी की… बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्याआधी श्री धुंडी विनायकाचे दर्शन घ्यावे लागते .ही मूर्ती स्वयंभू असून अशी गोष्ट आहे की बल्लाळास प्रसन्न होऊन श्री विनायक या ठिकाणी शिलारुपी पाषाणमूर्तीत अंतर्धान पावले. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे चिरेबंदी पाषाणाचे आहे . हे मंदिर पूर्वाभिमुख असून सूर्योदयाची प्रथम किरणे श्री बल्लाळेश्वरांच्या मूर्तीवर पडतात. व श्रीच्या डोळ्यातील व नाभीतील हिरे सूर्यकिरणामुळे आसमंतात झळाळून निघतात. ही मूर्ती अर्धगोलाकार असून डाव्या सोंडेची आहे.
चौथे क्षेत्र —श्री वरद विनायक ,महड.
हे क्षेत्र पालीपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे .पण महड व महाड या दोन नावांमध्ये खूप गोंधळ होतो. तसा आमचा देखील झालाच. आम्ही देखील जवळपास महाड जवळ पोहोचलो.. असो.
महड येथील श्री ची कथा काही वेगळीच आहे.गूत्समद ऋषींनी आपल्या मातेला शाप दिला होता म्हणून त्याचे प्रायश्चित्त करण्यासाठी त्यांनी आरण्यात जाऊन जप केला .तो जप ” ॐ गँ गणपतये नमः”असा होता. या जपामुळे गणेश त्यांना प्रसन्न झाले व त्यांच्या म्हणण्यानुसार श्री गणेशांनी महड येथे वास्तव केले. महड येथील देवालय भक्तांसाठी 24 तास चालू असते .तसेच हा गणेश इच्छापूर्ती पूर्ण करणारा म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे येथे भक्तांना कोरडी पूजा करण्यास परवानगी आहे. ही वरद विनायक मूर्ती स्वयंभू असून धोंडू प़ोढकर यांना ती तलावात सापडली.
पाचवे क्षेत्र — श्री चिंतामणी, थेऊर
ह्या गणेश मूर्तीची स्थापना कपिल मुनींनी केली आहे. हे क्षेत्र मुळा व मुठा नदीकाठी आहे. या गणेशाची म्हणजे चिंतामणीची कथा काही वेगळीच आहे .असे म्हटले जाते की कपिल मुनीच्या जवळ चिंतामणी नावाचे एक अनमोल रत्न होते ज्यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत .एके दिवशी गणासूर त्यांच्या आश्रमात आला व त्यांनी त्यास रत्नाच्या साह्याने पंचपक्वानांचे भोजन दिले .हा इच्छापूर्ती करणारा रत्न पाहून गणासुराला त्याचा मोह आवरता आला नाही. म्हणून त्या रत्नाची मागणी त्यांनी कपिलमुनी कडे केली पण त्यांनी त्यास देण्यास नकार दिला. ते रत्न गणासुराने हिसकावून घेतले. तेव्हा कपिल मुनींनी विनायकाची उपासना करून विनायकास प्रसन्न करून घेतले .व गणेशाने गणासुराचे कदम वृक्षाखाली पारिपत्य केले. हे सर्व पाहून कपिल मुनींनी ते अनमोल रत्न विनायकाच्या गळ्यात बांधले. म्हणून या गणेशाला चिंतामणी म्हटले जाते व या नगरास कदंब नगर म्हणून ओळखले जाते. अशी आहे ह्या चिंतामणी ची महती.
सहावे क्षेत्र—श्री गिरीजात्मक, लेण्याद्री.
हे क्षेत्र लेण्याद्री डोंगरावर आहे. आम्ही असे ऐकले होते की हा डोंगर चढण्यास खूप कठीण आहे. पण म्हणतात ना इच्छा असेल तर सर्व काही सुखकर होते तसेच आमचे झाले. एकमेकांच्या साथीने व साह्याने लेण्याद्रीचा डोंगर चढणे फारसे कठीण झाले नाही .तेथे आपणास डोली देखील मिळते. त्यामुळे तशी काही अडचण भासत नाही. चारी बाजूस मनाला व डोळ्यांना सुखविणारे सौंदर्य, समोर एक भला मोठासा डोंगर ..खरेच खूप सुंदर आठवणी आहेत त्या. जपून ठेवल्या पाहिजेत .चढण्यास सुरुवात केली व सुरेख अश्या 321 पायऱ्या आम्ही चढलो .पण खरेच खूप छान वाटते चढताना कारण निसर्गच इतका सुंदर आहे ते पाहता पाहता आपण कधी डोंगर चढतो हे समजतच नाही.
जेव्हा डोंगर संपतो तेव्हा पुढे आपणास मोठ्या लेण्या दिसतात ह्या लेण्यांमध्ये गणेशाची स्थापना झाली आहे. ही स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली आहे .खरे तर गणेश आपला पुत्र व्हावा म्हणून पार्वतीने गुहेत बारा वर्षे तपश्चर्या केली तेव्हा कुठे गणेश प्रसन्न होऊन पुत्र होण्यास मान्य केले व बहुरूपात गणेश प्रकट झाले .जेथे पार्वती मातेला गणेश प्रसन्न झाले तेथेच तिने गणेशाची स्थापना केली आहे. गणेश हा पार्वतीचा पुत्र असल्यामुळे त्यास “गिरिजात्मक” म्हटले जाऊ लागले. हा आहे याचा इतिहास .तसेच लेण्याद्रीचा निसर्ग डोळे भरून पाहणे व गिरिजात्मकाचे दर्शन घेणे किंवा होणे यालाच भाग्य म्हणावे लागते.
सातवे क्षेत्र—श्री विघ्नहर, ओझर.
हे सातवे क्षेत्र श्री विघ्नहर्ता यांची ओझर येथील स्थापना सर्व देवांनी मिळून केली आहे. विघ्नासुराचा नाश करण्यासाठी गजाननाने पाराशर ऋषींचा पुत्र म्हणून अवतार घेतला व विघ्नेश्वराचा नाश केला .तेव्हा विघ्नेश्वराने गजाननास आपले नाव धारण करावे व येथेच राहावे अशी प्रार्थना व विनंती केली. आणि म्हणून त्या प्रार्थनेस मान देऊन गजाननाने ” विघ्नहर “या नावाने येथे वास्तव केले आहे .ही श्रीची मूर्ती डाव्या सोंडेची असून आसन मांडी घातलेल्या स्थितीत आहे .खूप प्रसन्न मूर्ती आहे. पाहताक्षणी भक्त नतमस्तक होतो. हा विघ्नहर अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती गणला जातो.
आता शेवटचे क्षेत्र म्हणजेच आठवे क्षेत्र—
आठवे क्षेत्र— श्री महागणपती, रांजणगाव.
. हे क्षेत्र श्री भगवान शंकराने वसविले असून त्यांनीच गणेश मूर्तीची स्थापना रांजणगाव येथे केली आहे .असे म्हटले जाते की श्री भगवान शंकराने त्रिपुरासुर दैत्याचा नाश केला कारण हा दैत्य गूत्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासुर गणेशाने दिलेल्या वरामुळे खूप उन्मत झाला होता. त्याने देवांनाही जिंकले होते .म्हणून देवांच्या विनंतीवरून श्री भगवान शंकराने त्रिपुरा सुराचा नाश करायचे ठरविले व विनायकाला प्रसन्न करून घेतले. व त्या दैत्याचा नाश केला .या कारणास्तव त्रिपुरा पौर्णिमा म्हणण्यास येऊ लागली.
अशा प्रकारे हे आठ क्षेत्र आहेत. त्याचबरोबर गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा देव मानला जातो .त्याची नावे म्हणजेच गणपतीची नावे अनेक आहेत त्यातील काही नावे आपण पाहू. आता मी आपणास गणपतीचे बारा नावे सांगण्याचा प्रयत्न करते .गणपतीला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या. नावाने ओळखले जाते. नारद पुराणात गणपतीची बारा नावे सांगितली आहेत ती पुढील प्रमाणे.
.१) सुमुख —-सुंदर चेहरा
२) एकदंत —एक दात असणे किंवा असलेला
३) कपिल —कपिलचे पात्र असणे
४) गजा कर्ण– हत्तीचे कान असलेले.
५) लंबोदर—- लांब पोट
६) विकटा —आपत्तीचा नाश करणारा.
७) विनायक —-न्यायाधीश.
८) धूम्मकेतू —धूश्युक्त ध्वज असलेला.
९) गणाध्यक्ष— देवतांचा प्रमुख.
१०) भालचंद्र—-जो डोक्यावर चंद्र धारण करतो.
११) गजानन—हत्ती मुखी.
१२) विध्ननाशक—–अडथळे नष्ट करणारा गणपती.
अशाप्रकारे गणपतीचे नावे आहेत. तसेच हे आठ क्षेत्र खूप सुंदर आहेत .आयुष्यात सर्वांनी एकदा या क्षेत्राला जाऊन दर्शन घ्यावे आयुष्याचे सार्थक झाले असे वाटेल .आपल्या आजूबाजूला अनेक सुंदर देवळे आहेत जी आपण लक्षपूर्वक पाहिली तर बऱ्याच गोष्टी आपणास ज्ञात होतील. बरेच ज्ञान आपल्या देशात पहावयास मिळते. आपला इतिहास, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपला निसर्ग ,आपले सौंदर्य ,आपली देवावरील श्रद्धा खूप काही शिकवून जाते आणि आजच्या युगात ही खूप महत्त्वाची देखील आहे. हे अष्टविनायक दर्शन करीत असता आपणास शनिशिंगणापूर व शिर्डी साईबाबा तसेच जेजुरी यांचे देखील दर्शन घेता येते .आता आपण कुठल्या दिशेने प्रवास करतो प्रथम कुठे जातो हे महत्त्वाचा आहे.हे करत असता आम्ही ही दोन-तीन ठिकाणी पाहिली .तसेच आपणास देखील ह्या प्रवासात ही ठिकाणे पाहता येतील. हे अष्टविनायक दर्शन करीत असता आपणास कुठेही कोणतीही अडचण भासत नाही. कारण आजूबाजूला जेवणाची सोय, राहण्याची सोय सर्वकाही आपल्याला येथे उपलब्ध आहे.
आपल्या भारत देशाचे जे सौंदर्य आहे ते खूप सुंदर आहे .इथे आपणास प्रेम, देवावरील श्रद्धा ,भक्ती भाव हे फक्त भारतात पहावयास मिळते. हीच खरी संपत्ती व सौंदर्य आहे आपल्या देशाचे. हे जपून ठेवणे आपल्या हातात आहे. म्हणूनच मी थोडक्यात याची माहिती लिहिण्याचा प्रयत्न केला. आपल्याला नक्कीच आवडेल अशी आशा करते .खरेच जर आपल्याला आवडले तर नक्की लाईक करायला विसरु नका.
साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायक!
भक्तीने स्मरते नित्य आयु: कामार्थ साधती!
धन्यवाद
सौ. स्मिता सतीश चीरमोरे (गडकरी-किल्लेदार)
टिळकवाडी,बेळगाव
फोन नंबरः+919449969255