बेळगाव लाईव्ह: नात्या नात्यातील गोडवा हरवत चालला असताना बालमनावर संस्काराचे रोपटे रुजवण्याचे काम ज्ञान मंदिर इंग्लिश मिडीयम शाळा करत आहे.
प्रसार माध्यमांच्या आवाढव्या माऱ्यासमोर माणसातील भावबंद हरवत चालले आहेत मुलांची विश्व एकाकी बनत चालली असताना त्यांच्या आयुष्यात मागील पिढीचे असणे आल्हाददायक जाणीव करणारे असते त्या परंपरेला नवीन धुमारे फोडण्याचे काम शाळेतील उपक्रमा मार्फत होत असेल तर ही सामाजिक विण घट्ट होईल आणि संस्कार क्षम नवी पिढी घडेल त्याच बरोबर बालकांच्या एकाकी पणाला फाटा मिळेल.
बेळगावातील ज्ञानमंदिर इंग्लिश मीडियम शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अलका जाधव आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका फरीदा मिर्झा यांच्या संकल्पनेतून ‘ आजीआजोबा नातवंडांचे बंध’ हा दिन साजरा करण्यात आला.
द आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित शास्त्रीनगर येथील ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये आजीआजोबा व नातवंडातील बंध हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या शाळेच्या व्यवस्थापिका भक्ती मनोहर देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
यावेळी आजी आजोबांची आपल्या नातवंडांसोबत वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नातवंडांसह आजोबाआजींचा उत्स्फूर्त सहभाग होता. भक्ती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वी करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फरिदा मिर्झा यांनी केले, तर शेवटी शीतल पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
मुलांना प्रोत्साहन द्यायचे असेल तर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे गरजेची असते आणि ती जर आपल्या जिव्हाळ्याचे नाते बांधतील माणसांनी शाबासकी दिली तर आनंदाचे आभाळ भरून येते. या पार्श्वभूीवर ज्ञान मंदिर इंग्लिश मिडीयम शाळेने मुलांच्या आई वडिलांच्या व्यस्त जीवन शैलीला उतारा म्हणून पाल्याच्या आयुष्यात असणारे आजी आजोबांचे महत्व अधोरेखित केले हा पायंडा इतर शाळांनीही स्विकारण्याची आता गरज बनली आहे.
शाळा हे लहान मुलांचे दुसरे घरचं असते तिथं घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे पडसाद त्याच्या भावी आयुष्यात अखेर पर्यंत पडत असतात त्यामुळे ज्ञान मंदिर शाळेने केलेल्या उपक्रमाचे समाजातून विशेष कौतुक केले जात आहे.