बेळगाव लाईव्ह :मूळचे बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील रहिवासी आणि बेंगलोर येथे काम करणारे सायकलिंगपटू अभियंता राजकुमार खोत यांनी प्रतिष्ठेची पॅरिस ब्रेस्ट पॅरिस (पीबीपी) ही 1,230 कि.मी. अंतराची खडतर जागतिक सायकलिंग शर्यत निर्धारित वेळेच्या आत यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा पराक्रम दुसऱ्यांदा केला असून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
पॅरिस ब्रेस्ट पॅरिस (पीबीपी) ही 1,230 कि.मी. अंतराची सायकलिंग शर्यत 90 तासात पूर्ण करावयाची असते. ऑडेक्स क्लब पॅरिसन यांच्यातर्फे आयोजित केली जाणारी ही जगातील सर्वात जुनी सायकल शर्यत असून जिला 100 वर्षाहून अधिक जुना इतिहास आहे. या शर्यतीचा मार्ग फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक समुद्राच्या काठावर वसलेल्या ब्रेस्ट शहरापर्यंत 600 कि.मी. आणि तेथून पुन्हा परत पॅरिसपर्यंत असा असतो.
दर चार वर्षातून एकदा ऑगस्ट महिन्यामध्ये ही शर्यत आयोजित केली जाते. त्या अनुषंगाने या शर्यतीची विसावी आवृत्ती गेल्या 20 ते 24 ऑगस्ट 2023 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये जगभरातील सुमारे 7000 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या शर्यतीसाठी सुपर रेनडोनर सिरीज (200 कि.मी., 300 कि.मी., 400 कि.मी., 600 कि.मी.) वेळेत पूर्ण करणारे सायकलपटूच पात्र असतात.
या पद्धतीने जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी पॅरिस ब्रेस्ट पॅरिस ही खडतर शर्यत बेळगाव जिल्ह्याचे सुपुत्र राजकुमार खोत यांनी 71 तास 26 मिनिटात पूर्ण केली. या पराक्रमाबद्दल सायकलिंगसह क्रीडा क्षेत्रात त्यांचे अभिनंदन होत आहे. राजकुमार खोत यांनी यापूर्वी 2022 मध्ये इंग्लंड येथील लंडन ईडनबर्ग लंडन (एलईएल) ही 1500 कि.मी. अंतराची शर्यत, 2020 मध्ये थायलंड येथील आयएसएएन -2020 ही 2,024 कि.मी. अंतराची शर्यत, 2019 मध्ये आयर्न मॅन 70.3 गोवा ही आंतरराष्ट्रीय शर्यत यशस्वीरित्या पूर्ण केली असून 2014 ते 2019 या कालावधीत त्यांनी सात वेळा सुपर रेनडोनर शर्यतीच्या मालिका पूर्ण केल्या आहेत.
थोडक्यात सांगावयाचे झाल्यास गेल्या 10 वर्षात राजकुमार खोत यांनी 100,000 पेक्षा अधिक कि.मी. अंतराचे सायकलिंग केले आहे. एक छंद म्हणून नऊ दिवसात त्यांनी संपूर्ण कर्नाटकात 2,250 कि.मी. अंतराचा सायकल प्रवास केला आहे. दक्षिण भारतातील निलगिरीच्या 1000 कि.मी. अंतराच्या सायकलिंग दौऱ्यातही त्यांचा सहभाग होता.