बेळगाव लाईव्ह -117 वर्षाची परंपरा असलेल्या येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला गेल्या आर्थिक वर्षात 2 कोटी 7 लाख 87 हजाराचा ढोबळ नफा झाला असून 1 कोटी 55 लाख 55 हजाराचा निव्वळ नफा झाला आहे” अशी माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बँकेची 117 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या रविवारी सकाळी साडेअकरा वाजता बँकेच्या मठ गल्ली येथील मुख्य कार्यालयात संपन्न होत असून त्याच्या पार्श्वभूमीवर बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते पत्रकारांना माहिती देत होते .
बँकेच्या इतिहासात प्रथमच एवढा नफा झाला असून बँकेकडे 127 कोटी 47 लाखाच्या ठेवी ही आहेत. तर बँकेने 94 कोटी 16 लाखाची कर्जे वितरित केली आहेत . बँकेचे भाग भांडवल 2 कोटी 43 लाख रुपयांचे असून राखीव निधी 18 कोटी 67 लाख झाला आहे.
बँकेने 47 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून 152 कोटीचे खेळते भांडवल आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने 222 कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय केला असून बँकेच्या मुख्य शाखेसह शहापूर, गोवावेस आणि मार्केट यार्ड अशा एकंदर चार शाखा कार्यरत आहेत.
बँकेची निव्वळ आणि अनुत्पादित कर्जे शून्य टक्के असून एनपीएचे प्रमाणही 0% आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो असेही श्री अष्टेकर म्हणाले.
गेल्या वर्षभरात बँकेच्या ठेवीमध्ये सुमारे 22 कोटी रुपयांची वाढ झाली असून कर्जामध्ये सुद्धा 18 कोटी रुपये वाढ झाली आहे. कोरोना 19 चा फटका संपूर्ण जगभराबरोबरच बँकिंग क्षेत्रालाही बसला असला तरीही कर्मचारी वर्ग आणि संचालक मंडळ यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि ग्राहकांच्या सहकार्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती मजबूत झालेली आहे. बँक दिवसेंदिवस आर्थिक रित्या सुदृढ व सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असून त्यादृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. ग्राहकांना अधिकाधिक सुरक्षित डिजिटल बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून सध्या बँकेत मोबाईल बँकिंग सेवा सुरू आहे.
सभासदांच्या ठेवींच्या सुरक्षिततेसाठी बँकेने पाच लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण प्रदान केले आहे. सध्या ठेवीवर साडेआठ टक्के इतका व्याजदर दिला जात असून ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्के जादा व्याज दिले जाते.कर्ज वितरण करताना रिझर्व बँकेने घालून दिलेल्या कार्यप्रणालीनूसार आम्ही प्रायोरिटी सेक्टरला 63.61% तर दुर्बल घटकांना 17.48% कर्ज वितरित केले आहे. असेही श्री अष्टेकर यांनी यावेळी सांगितले.
बँकेने गत वर्षाप्रमाणेच यंदाही अ वर्ग सभासदांना 20% इतका तर ब वर्ग सभासदांना आठ टक्के इतका लाभांश देण्याची तरतूद केली असल्याची माहिती त्यांनी दिली. याचबरोबर सभासद कल्याण फंडातून अनेक ज्येष्ठ सभासदांना 1000 रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना गेल्या दोन वर्षापासून लागू करण्यात आली असून त्याचा सर्वच कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतला आहे. लवकरच बँकेचे एटीएम कार्ड वितरित केले जाणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महिला सबलीकरणासाठी गेल्या आर्थिक वर्षात ग्रुप मायक्रो फायनान्स सुरू केले असून त्याचा फायदा पाचशेहून अधिक महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी करून घेतला. या पुढेही ही योजना कार्यान्वित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेचा विस्तार करण्यासाठी हालचाली सुरू असून नव्या तीन शाखा सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित खात्याकडे परवानगी मागण्यात आली असून येत्या वर्षभरात हे कार्यान्वित होईल असा मला विश्वास वाटतो. असे चेअरमन अष्टेकर यांनी सांगितले
या पत्रकार परिषदे प्रसंगी व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण पाटील, संचालक अनंत लाड, शिवराज पाटील, सुवर्णा शहापूरकर, गजानन पाटील, यल्लाप्पा बेळगावकर, गजानन ठोकणेकर, विद्याधर कुरणे मारुती शिगीहळळी आणि सीईओ अनिता मूल्या उपस्थित होत्या