बेळगाव लाईव्ह :बेळगावचा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असा श्री गणेशोत्सव नुकताच पार पडला. तब्बल 350 हून अधिक सार्वजनिक श्री गणेश मूर्तींचे लाखो गणेश भक्तांच्या साक्षीने मिरवणुकीने विसर्जन करायचे ही सोपी गोष्ट नाही. मात्र हे कठीण काम बेळगाव जिल्हा प्रशासनाने अत्यंत कुशलपणे यशस्वीरित्या शांतीपूर्वक सुसज्जपणे पार पाडले आहे.
गेल्या गुरुवारी सायंकाळी बेळगाव प्रारंभ झालेली श्री गणेश विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री 11 वाजता समाप्त झाली. सदर 30 तास चाललेल्या या मिरवणुकीने एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. अत्यंत नीटनेटकेपणाने कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा गोंधळ न होता मिरवणूक सुरळीत पार पाडल्याबद्दल जिल्हा प्रशासन प्रशंसेस पात्र ठरले आहे.
बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची दूरदृष्टी आणि योग्य नियोजन करण्याच्या कौशल्य यामुळे यावर्षी जवळपास महिनाभर आधीच श्री गणेशोत्सवाच्या तयारीची बैठक झाली आणि त्यामध्ये अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. त्यानंतर बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणण्यात त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याद्वारे उत्सवासाठी आवश्यक सर्व जय्यत तयारी सिद्धता केली. तसेच स्वतः या सिद्धतेची पाहणी केली. त्याचे फलित म्हणजे यंदाचा श्री गणेशोत्सव कोणत्याही समस्या निर्माण न होता अपूर्व उत्साहात अतिशय सुरळीतपणे पार पडला.
बेळगाव महानगरपालिकेने देखील यावेळी श्री गणेश उत्सवासाठी आवश्यक असलेल्या अनुदानाचे वेळेवर वितरण केले. श्री गणेशोत्सव सुरळीत व्हावा यासाठी बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी हे तर गेल्या दोन आठवड्यापासून सतत धावपळ करत होते. विसर्जन मिरवणूक मार्गाची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रेक्षक गॅलरीची उभारणी, कपिलेश्वर तलावांसह शहरातील इतर सर्व तलावांची स्वच्छता आणि रंगरंगोटी, मोठ्या भव्य मूर्तींसाठी क्रेनची व्यवस्था करण्याबरोबरच आवश्यक अन्य सोयी -सुविधा उपलब्ध करून देण्याद्वारे मनपा आयुक्त दूडगुंटी यांनी जनतेचे आणि बाप्पाचे आशीर्वाद मिळविले आहेत. तब्बल 30 तास चाललेल्या विसर्जन मिरवणूक काळात घेतलेल्या परिश्रमामुळे आयुक्त अशोक दूडगुंटी, पालिकेचे अन्य सर्व अधिकारी, कर्मचारी पौरकार्मिक व नगरसेवक जनतेच्या प्रशंसेस पात्र ठरले आहेत.
सलग 30 तास सुरू असलेली श्री गणेश विसर्जन मिरवणूक कोणतीही अप्रिय घटना न घडता शांततेने सुरळीत पार पडण्यासाठी बंदोबस्तासाठी अहोरात्र तैनात असलेल्या हजारो पोलीस कर्मचाऱ्यांचे परिश्रम देखील कारणीभूत आहेत. बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त सिद्रामप्पा, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह सर्व एसीपी, सीपीआय, पीएसआय आणि हजारो पोलिसांनी क्षणभरही विश्रांती न घेता निरंतर पहरा देण्याचे अतिशय अवघड काम सुरेखरित्या पार पाडले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन देखील बेळगाव शहरवासीयांच्या प्रशंसेस पात्र ठरले आहे.
यापूर्वी दरवर्षी श्री गणेशोत्सव काळात शॉर्टसर्किट अथवा अन्य कारणाने वीज पुरवठ्याच्या बाबतीत दुर्घटना घडून बऱ्याच जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यावर्षी मात्र हेस्कॉमने आपले कर्तव्य चोख पार पाडताना सतर्कपणे कार्य करत कोणतीही दुर्घटना घडू दिली नाही. सुरळीत व सुरक्षित वीज पुरवठ्यासाठी हेस्कॉमचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र झटत होते. त्यांनी विसर्जन मिरवणूक मार्गावरील अडथळा ठरणाऱ्या तसेच खाली लोंबकळणाऱ्या धोकादायक विजेच्या तारा तसेच काही ठिकाणी विजेचे खांब हटवून यावर्षी कोणतीही दुर्घटना घडणार नाही या दृष्टीने दक्षता घेण्याचे उल्लेखनीय कार्य केले. हेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक महंमद रोशन आणि तांत्रिक संचालक एस. सोसालट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अभियंता बी प्रकाश यांच्यासह हेस्कॉम अधिकारी प्रवीण चिक्कोडी, सुनीलकुमार, एस. जे. हम्मण्णावर, विनोद केरूर, अश्विन शिंदे, अंगडी, सिद्राम कांबळे, शीतल सनदी, प्रवीण मरगाळे, कळ्ळीमणी, हैबत्ती, जगदीश मोहिते, पवन कुमार, हंदीगुंडी, इकबाल तहसीलदार आदींसह शेकडो वायरमननी केलेले कार्य देखील अत्यंत प्रशासनीय म्हणावे लागेल. एकंदर यंदाचा श्री गणेशोत्सव अपूर्व उत्साहात शांततेने सुरळीत पार पडण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या परिश्रम घेतलेल्या सर्वांना बेळगाव लाईव्हचा सलाम आणि शतश: धन्यवाद!!!