Friday, October 18, 2024

/

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रामदेव गल्ली अंधारात

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे श्री गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहराच्या मध्यवर्ती असलेली रामदेव गल्ली अंधारात बुडाल्याची घटना काल रात्री घडली. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसह गणेश भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी घेतल्या जाणाऱ्या प्रशासनाच्या बैठकीमध्ये श्री गणेश उत्सवाला प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवसापासून ते श्री गणेश विसर्जनापर्यंत प्रत्येक विसर्जन तलाव श्री विसर्जन मिरवणूक मार्ग आणि शहरातील प्रमुख चौकांमध्ये फोकसची अर्थात फ्लड लाईट्सची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला जातो.

त्यानुसार यंदाही तो घेण्यात आला होता. मात्र काल श्री गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळनंतर शहराच्या मुख्य बाजारपेठे पैकी एक असलेल्या रामदेव गल्लीमधील फ्लड लाईटसह रस्त्यावरील पथदीप देखील बंद होते. यामुळे रस्त्यावर अंधाराचे वातावरण निर्माण झाले होते. सदर प्रकार मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी लागलीच हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना त्याबाबतची माहिती दिली.

त्यावेळी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठा करणे, रस्त्यावरील वीज वाहिन्यांचा अडथळा दूर करणे, खंडित वीज पुरवठ्याची दुरुस्ती ही कामे आमच्या अखत्यारीत येतात जी आम्ही करत आहोत असे असे सांगून पथदीप बसविण्याचे काम महापालिका व स्मार्ट सिटी लिमिटेडचे असल्याचे स्पष्ट केले.

हेस्कॉम अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतर कलघटगी यांनी मनपा आयुक्तांशी संपर्क साधून बंद पथदीप व फ्लड लाईट विषयी त्यांना माहिती दिली. त्यावेळी त्यांनी दिलगिरी व्यक्त करून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे, त्याचप्रमाणे आज बुधवारी रात्री गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मुख्य मिरवणूक मार्गाची पाहणी करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान कालच्या रामदेव गल्ली येथे अंधार पसरून गैरसोय निर्माण होण्यासारखे प्रकार महापालिका, हेस्कॉम आणि वनखाते यांच्यातील समन्वयाअभावी घडत असल्याचे बोलले जात आहे.

तथापि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी जागरूकपणे कार्यरत असल्याबद्दल सर्वसामान्य नागरिक आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये त्यांची प्रशंसा होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.