बेळगाव लाईव्ह :महिनाभरापूर्वी दोन कैद्यांमध्ये मारामारी झालेल्या हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहामध्ये आता पुन्हा कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. मोबाईल फोनवरून दोन कैद्यांमध्ये झालेल्या या हाणामारीत एक जण जखमी झाला आहे.
वासुदेव नाईक (वय 34) असे जखमी झालेल्या कैद्याचे नांव असून त्याच्यावर कारागृहातील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. वासुदेव हा चोरी प्रकरणी गेल्या आठ महिन्यापासून हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगत आहे.
मोबाईलबद्दल विचारना करून अन्य एका कैद्याने त्याच्यावर हल्ला केला. तथापि वासुदेवला कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांनीच मारहाण केला असल्याचा आरोप त्याची आई सुनंदा नाईक हिने केला आहे. वासुदेव याला मारहाण झाल्याची माहिती मिळताच रायबाग तालुक्यातील खणादाळ येथून नाईक कुटुंबीय त्याची विचारपूस करण्यासाठी बेळगावला आले आहेत.
दरवेळी प्रमाणे मागितलेले पैसे यावेळी न दिल्यामुळे कारागृहातील पोलिसांनी वासुदेवला मारहाण केल्याचे त्याची आई सुनंदा हिने सांगितले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार वासुदेव हा शौचालयात जाऊन मोबाईलवर बोलत होता.
त्याबद्दल अन्य एका कैद्याने विचारणा केली असता, उभयतात बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान वासुदेव याला मारहाण होण्यामध्ये झाल्याचे समजते.