बेळगाव लाईव्ह:श्री गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यापासून उत्तम काम करणाऱ्या हेस्कॉमचे नांव काही निष्क्रिय कामचुकार अधिकाऱ्यांमुळे खराब होत आहे. अशाच एका बेजबाबदार सेक्शन ऑफिसरमुळे भगतसिंग चौक, पाटील गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचा मंडप धोक्याच्या छायेत वावरत असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या विनंतीला मान देऊन श्री गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून हेस्कॉमकडून शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे.
वीजपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्याबरोबरच रस्त्यावरील खाली लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा व्यवस्थित करणे, जुने धोकादायक इलेक्ट्रिक खांब हटविणे, तातडीच्या दुरुस्त्या करणे वगैरे कामे त्वरेने केली जात असल्यामुळे हेस्कॉम प्रशंसेस पात्र ठरत आहे मात्र हे होत असतानाच दुसरीकडे वेळच्यावेळी तक्रारीची दखल न घेणाऱ्या त्यांच्या कांही सेक्शन ऑफिसर्समुळे सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. भगतसिंग चौक, पाटील गल्ली हे या मंडळांपैकी एक आहे.
श्री शनी मंदिरा नजीकच्या भगतसिंग चौक, पाटील गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या मंडपावरून विजेच्या तारा गेल्या आहेत. या तारा मंडपाच्या छतानजिक धोकादायक स्थितीत आहेत. मंडप उभारण्यापूर्वी सदर तारा संदर्भात संबंधित सेक्शन अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र त्याची दखल घेण्यात न आल्यामुळे मंडप उभारणार्या कंत्राटदाराला मोठी कसरत करून नाईलाजाने त्या तारांखालीच मंडप उभारावा लागला आहे. त्याचप्रमाणे श्री गणेश चतुर्थी दिवशी मंडपाच्या मानाने श्री मूर्ती थोडी मोठी झाल्यामुळे कंत्राटदाराला पुन्हा सुधारणा करून मंडपाची उंची वाढवावी लागली. त्यानंतर आता त्या मंडपात बाप्पाची मूर्ती विराजमान झाली असली तरी विजेच्या तारांमुळे उंची कमी झालेल्या मंडपाच्या छतापर्यंत मूर्तीचे मस्तक पोहोचले आहे.
सदर मंडप विजेच्या तारांना स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने उभारण्यात आला असला तरी काहींशा खाली लोंबकळणाऱ्या त्या तारांचा धोका टळलेला नाही. या संदर्भात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हेस्कॉमच्या संबंधित सेक्शन अधिकाऱ्याकडे वारंवार तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबतची माहिती मिळताच काल मध्यवर्ती या सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर, सागर पाटील यांनी भगतसिंग चौक पाटील गल्ली श्री गणेश मंडपाला भेट देऊन पाहणी केली. तसेच सदर धोकादायक विजेच्या तारांची बाब पुन्हा एकदा हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. श्री शनी मंदिर येथील भगतसिंग चौकासह पाटील गल्ली हा मार्ग कायम रहदारीने गजबजलेला असतो.
सध्या पावसाळ्याच्या दिवसात संबंधित विजेच्या तारांमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित सेक्शन अधिकाऱ्याला चांगली समज देण्याबरोबरच भगतसिंग चौकातील श्री गणेश मंडपावरील विजेच्या तारांची समस्या त्वरित दूर करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.