बेळगाव लाईव्ह :ज्ञानदानाबरोबरच इतर सामाजिक कार्य आणि संशोधनाची दखल घेत शहरातील समाजसेवी संस्था जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) यांच्यातर्फे प्राथमिक शाळापासून विद्यापीठापर्यंतच्या शिक्षकांसाठी सन 2023 चे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत.
शहरातील जायंट्स भवन येथे येत्या मंगळवार दि. 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सदर पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जायंट्स मेनने निवड केलेल्या शिक्षकांची नावे आणि त्यांचा थोडक्यात परिचय पुढील प्रमाणे आहे.
प्रा. डॉ. जे. मंजान्ना – राणी चन्नम्मा विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आहेत. आजवर एकूण 12 संशोधनांचे पेटंट्स त्यांना मिळाले आहेत. पीएचडी नंतरच्या संशोधनासाठी त्यांनी टोकियोमध्ये (जपान) 6 वर्षे संशोधन केले आहे. विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या खर्चाने त्यांनी सुसज्ज प्रयोगशाळा निर्माण केली आहे. प्रा. डॉ. अशोक डिसोजा -हे राणी चन्नम्मा विद्यापीठातील समाजकार्य विभागाचे प्रमुख असून त्यांनी विद्यार्थ्यांतून समाजसेवक घडविले आहेत.
सध्या ते प्राध्यापक संघटनेचे अध्यक्षही आहेत. विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या खेड्यातील पाच शाळांमध्ये ते विविध उपक्रम राबवत आहेत. या खेरीज ते शहर व ग्रामीण भागातील अनेक समाजसेवी संस्थांना मदत व मार्गदर्शन करत असतात. निंगाप्पा बाळेकुंदरगी -जंगलातील आमगाव (कणकुंबी) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून गेली 26 वर्षे ते कार्यरत आहेत. अरण्य विभागातील गैरसोयी ओळखून ते विद्यार्थ्यांना ज्ञानदान करतात. त्यांचे सामाजिक कार्यही आहे.
कुशकुमार लक्ष्मण देसाई -प्रयोगशील शिक्षक आणि समाजसेवक म्हणून देसाई सुपरिचित आहेत. मासगोंडहट्टी येथे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महेश विष्णू सडेकर -जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयात सेवारत असून कोरोना काळात शैक्षणिक व्हिडिओ बनवणे, गायन, वादन, नाट्य, दिग्दर्शन इत्यादींसाठी ते मार्गदर्शन करत असतात.