बेळगाव लाईव्ह :उत्तर कर्नाटकातील वैशिष्टपूर्ण पारंपरिक अशा बेळगावच्या गणेशोत्सवाची सांगता काल गुरुवारी अनंत चतुर्दशीने झाली असली तरी ढोल-ताशे व अन्य पारंपारिक वाद्यांच्या जल्लोषी वातावरणात काल दुपारी 4 च्या सुमारास सुरू झालेली श्री गणेश विसर्जन मिरवणूक आज शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता म्हणजे तब्बल सुमारे 18 तास उलटले तरी सुरूच होती. उत्सवाची धार्मिक परंपरा आणि पावित्र्य राखून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ च्या जयघोषात सार्वजनिक श्री मुर्तींना जड अंतकरणाने कपिलेश्वर तलावांमध्ये निरोप देण्यात येत आहे.
काल अनंत चतुर्दशी दिवशी सकाळपासूनच बाप्पाच्या निरोपाची तयारी करण्यासाठी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये लगबग सुरू झाली होती. माळी गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने सर्वप्रथम दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कपिलेश्वर तलावांमध्ये श्री मूर्तीचे विसर्जन केले. त्यानंतर आज सकाळपर्यंत अनेक श्री मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. काल सकाळच्या सत्रात या तलावामध्ये प्रामुख्याने घरगुती गणपतींचे विसर्जन पार पडले, तर दुपारी 4 नंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री मूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. कपिलेश्वर येथील दोन्ही तलाव मराठा मंदिरनजीकचा जक्केरीहोंड येथे श्री मुर्तींचे विसर्जन झाले. घरगुती मूर्तींचे किल्ला तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले तर अनगोळ आणि जुने बेळगाव येथील तलावाच्या ठिकाणीही श्री मूर्ती विसर्जनासाठी गर्दी झाली होती.
नरगुंदकर भावे चौक येथून काल गुरुवारी सुरू झालेली श्री विसर्जन मिरवणूक लांबली असून आज शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही गणेश विसर्जनाचा उत्साह कायम आहे. शहरातील कपिलेश्वर जुना व नवा तलाव दोन्ही प्रमुख विसर्जन तलावाच्या ठिकाणी आज सकाळी 11 वाजले तरी सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन अवरीत सुरूच होते. या दोन्ही तलावाच्या ठिकाणी लोकप्रतिनिधी अधिकारी व इतर मान्यवरांना विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी भव्य व्यासपीठाची उभारणी करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत सर्वात शेवटी असलेल्या चव्हाट गल्लीच्या राजासह खडक गल्ली व गणाचारी गल्लीच्या श्री गणेश मूर्ती आज सकाळी 8 वाजता मारुती गल्लीमध्येच होत्या. त्याचप्रमाणे त्यांच्यापुढे असलेले अन्य कांही सार्वजनिक गणपती विसर्जन तलावापासून अर्ध्या वाटेवर होते. शहरातील 378 सार्वजनिक श्री गणेश मूर्तींपैकी श्री कपिलेश्वर नव्या तलावाच्या ठिकाणी सकाळी 11:30 वाजता एकूण 98 सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन पूर्ण झाले होते. या तलावाच्या ठिकाणी आज सकाळी देखील महापौर शोभा सोमनाचे व उपमहापौर रेश्मा पाटील आवर्जून उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे काल रात्री स्वतः जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बराच काळ या तलावाच्या ठिकाणी उपस्थित राहून बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याचा आनंद लुटला.
एकंदर काल दुपारनंतर सुरू झालेली विसर्जन मिरवणूक अशा प्रकारे जवळपास 18 तास उलटून गेले तरी सुरूच आहे. विसर्जन तलावाच्या ठिकाणी महापालिकेने क्रेन, स्वयंसेवक जलतरणपटू वगैरे आवश्यक सर्व ती सिद्धता केलेली आहे. आज शुक्रवारचा दिवस दिवस उजाडला तरी गणेश भक्तांचा उत्साह तीळभरही कमी न होता अधिकच ओसंडून वाहत आहे. मिरवणूक लांबली असली तरी पोलिसांनी केलेल्या सौम्य लाठी मारायच्या कांही घटना वगळता कोणतेही गालबोट न लागता आतापर्यंत अपूर्व जल्लोष, उत्साह व शांततेमध्ये गणरायांचे विसर्जन सुरू आहे. श्रीमूर्ती विसर्जनाचा वेग पाहता मिरवणूक समाप्त होण्यास आज दुपारचे 3 वाजतील असा अंदाज आहे.
मुंबई पुण्यानंतर सर्वात मोठा गणेशोत्सव हा बेळगावमध्ये साजरा करण्यात येतो. कोरोना प्रादुर्भावाचा दोन वर्षाचा कालावधी वगळता गेल्यावर्षी आणि यंदा श्री विसर्जन मिरवणुकीमध्ये अपूर्व उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. काल अनंत चतुर्दशी दिवशी दुपारपासून विसर्जन तलाव गणेश भक्तांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. आतापर्यंत शहरातील पहिला मानाचा सार्वजनिक गणपती असणाऱ्या झेंडा चौकातील गणपतीसह अन्य सार्वजनिक गणपतीचे टाळ-मृदंग वगैरे पारंपारिक वाद्यांसह ढोल-ताशाच्या दणदणाटात फटाक्यांची आतषबाजी करत कपिलेश्वर तलावात विधीवत विसर्जन करण्यात आले. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ च्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला. शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी काल दुपारनंतर मंडपाबाहेर काढण्यात आल्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या गणेश मूर्ती घेऊन सवाद्य फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणुकीने तलावाच्या ठिकाणी येताना दिसत होते. दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत सार्वजनिक श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी मंडपाबाहेर काढण्यात येत असल्यामुळे शहरातील शेवटच्या सार्वजनिक श्री गणेश मूर्तीचे विसर्जन होण्यास आजचा दुसरा दिवस उजाडला आहे.
अपूर्व उत्साह आणि जल्लोषात प्रारंभ झालेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांचाही सक्रिय सहभाग होता. विशेष करून बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी यावेळी ढोल वादनाचा आनंद लुटला. पोलीस उपायुक्त (डीसीपी) रोहन जगदीश यांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता. कायदा व सुव्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवण्याबरोबरच डीसीपी जगदीश संधी मिळेल तेंव्हा गणेश भक्तांमध्ये मिसळून विसर्जन मिरवणुकीचा आनंदही लुटताना दिसत होते. एका ठिकाणी तर सर्वसामान्य गणेश भक्ताप्रमाणे गणपती बाप्पा मोरयाच्या तालावर ठेका धरून हात उंचावून चक्क नृत्य करत ते श्री गणेशाच्या भक्तीत तल्लीन झाले होते. पोलीस उपायुक्त दर्जाच्या या मोठ्या अधिकाऱ्याचे श्री गणेश भक्तीत लीन होऊन सुरू असलेले बेभान नृत्य मिरवणुकीतील गणेशभक्त व कार्यकर्त्यांचा उत्साह दुनावणारे ठरले.
दरम्यान, श्री गणेश विसर्जन शेवटपर्यंत सुरळीत शांततेने पार पडावी यासाठी शहरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस, जिल्हा सशस्त्र पोलीस दल, केएसआरपी तुकड्यांसह परजिल्ह्यातूनही अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली आहे. एकंदर बंदोबस्तासाठी सुमारे 2000 हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याखेरीज पोलिसांची होयसाळ व शक्ती वाहने सातत्याने गस्तीवर आहेत. त्याचप्रमाणे ड्रोन कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह साध्या वेशातील पोलिसांची सर्व घडामोडींवर नजर आहे.