Saturday, September 28, 2024

/

बापालाच आढळला पोटच्या मुलाचा झाडावर लटकलेला सांगाडा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :घरातून सुमारे अडीच महिन्यापासून बेपत्ता असलेल्या 21 वर्षीय युवकाचा अस्थिपंजर अर्थात सांगाडा एका झाडावर फासावर लटकत असल्याचा प्रकार नुकताच खानापूर तालुक्यातील वड्डेबैल नजिकच्या जंगलात उघडकीस आला. योगायोग म्हणजे चरावयाला सोडलेल्या आपल्या जनावरांना शोधण्यासाठी गेलेल्या मृत युवकाच्या वडिलांनाच झाडावरील त्याचा सांगाडा निदर्शनास आला.

मृत युवकाचे नाव वैभव परशराम पाटील (वय 21 रा वड्डेबैल, ता खानापूर) असे आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैभव हा गेल्या 23 जूनपासून बेपत्ता झाला होता. त्याचे कुटुंबीय त्याचा सर्वत्र शोध घेत होते. या संदर्भात वैभवचे वडील परशराम यांनी तो बेपत्ता झाला असल्याची तक्रार नंदगड पोलीस ठाण्यात नोंदवली होती.

बेपत्ता झालेल्या वैभवला शोधण्यासाठी पाटील कुटुंबीयांनी जंग जंग पछाडले. मात्र सर्वत्र शोध घेऊन देखील त्याचा पत्ता लागू शकला नाही. अखेर हताश झालेल्या सर्वांनी वैभव एक दिवस स्वतःहून घरी परतले या आशेवर शोधकार्य थांबवले.

शेतकरी असलेले वैभवचे वडील परशराम दररोज सकाळी गावानजीकच्या जंगलात आपली जनावरे चरावयास सोडतात. त्यानुसार गेल्या बुधवारी सकाळी त्यांनी आपली जनावरे जंगलानजीक चरावयास सोडली होती. त्यानंतर दुपारच्या सुमारास आपल्या जनावरांना पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी त्यांची गोळा गोळा करत असताना झाडाझुडपांच्या आडोशाला एका झाडावर त्यांना एक मानवी सांगाडा फासावर लटकलेला आढळला. कुतूहालापोटी त्याने जवळ जाऊन निरीक्षण केले असता त्या सांगाड्याच्या अंगावरील शर्ट, पॅन्ट व पायातील सॅंडल आपला मुलगा परशराम याचेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले.Vaddebail

तेंव्हा त्यांनी लागलीच त्याबाबतची माहिती गावकऱ्यांना दिली आणि गावकऱ्यांनी त्याबाबत पोलिसांना कळवले. सदर माहिती मिळताच नंदगड पोलीस खाण्याचे पोलीस निरीक्षक सी. ए. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन पोलिसांना त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात केले. त्यानंतर मयत वैभवच्या सांगाड्याची उत्तरीय तपासणी गुरुवारी करण्यात आली.

दरम्यान वैभवने आत्महत्या केली की हा खुनाचा प्रकार आहे? याबाबत पोलिसांकडून शहानिशा होणे बाकी आहे. सदर घटनेची नंदगड पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.