बेळगाव लाईव्ह :सुशोभित सुळगा (हिं) श्री ब्रह्मलिंग मंदिर 11 रोजी लोकार्पणकोणत्याही सरकारी निधी विना, राजकीय नेत्यांच्या मदतीशिवाय सुळगा (हिं) येथील युवकांनी लोकवर्गणीतून श्रमदानाने सुशोभीकरण केलेल्या गावचे ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या सोमवारी 11 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
सदर लोकार्पण सोहळ्यानिमित्त मंदिरामध्ये श्री महारुद्राभिषेकासह इतर धार्मिक कार्यक्रम होणार असून त्याबरोबरच महिला भजनी मंडळाचा हरिपाठचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याखेरीज लोकार्पण सोहळ्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. तरी याचा गावकऱ्यांसह परिसरातील समस्त भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सुळगा (हिं) येथील ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग मंदिर आणि आवाराचे सुशोभीकरण गावातील युवकांनी वर्गणी गोळा करून स्वतः श्रमदानातून केले आहे. यापूर्वी गेल्या तीन-चार वर्षांपासून मंदिराच्या आवारात ड्रेनेजचे सांडपाणी साचून स्वच्छता निर्माण होण्याबरोबरच दुर्गंधीचे वातावरण पसरलेले असायचे. त्यामुळे मंदिराच्या पावित्र्यास धोका निर्माण झाला होता. यासंदर्भात देवस्की पंच कमिटी व गावातील युवकांनी सरकार दरबारी सातत्याने तक्रार करून देखील त्याची दखल घेण्यात आली नाही.
अखेर चार महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीने मंदिराच्या ठिकाणी जमा होणारे ड्रेनेजचे सांडपाणी गटार बांधून अन्यत्र वळविले. मंदिरा आवारात सांडपाणी साचणे बंद होताच गावातील युवकांनी मंदिराचा कायापालट करण्याचे ठरवून त्यासाठी गावपातळीवर बैठक घेण्याद्वारे मंदिर सुशोभीकरणाचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे यासाठीचा निधी लोकवर्गणीतून म्हणजे गावकरी स्वेच्छने देतील त्या पैशातून उभारण्याचे ठरले.
याबरोबरच युवकांनी देवस्की पंच कमिटीला निवेदन देऊन, विश्वासात घेऊन मंदिर सुशोभीकरणाच्या कार्याला सुरुवात केली. विशेष म्हणजे या कार्यासाठी कोणत्याही सरकारी निधीची अथवा कोणत्याही राजकीय पुढाऱ्याची मदत घेण्यात आली नाही. गावातील सर्वसामान्य नागरिकांनी स्वेच्छने दिलेल्या आर्थिक मदतीतून गावातील युवकांनी गेल्या 31 जुलै 2023 रोजी भूमिपूजन करून मंदिर सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर सर्व युवकांनी समन्वयाने आजतागायत दिवसभर आपापल्या कामावर जाऊन दररोज सायंकाळी 7 नंतर स्वतःला मंदिर सुशोभीकरणाच्या कामाला जुंपून घेतले होते.
प्रशासनाच्या मदतीविना सामाजिक बांधिलकीतून आपण आपल्या गावातील कोणतेही विकास कार्य करू शकतो हे दाखवून देणाऱ्या सुळगा (हिं) येथील युवकांचा आत्मविश्वास, जोडीला त्यांची जिद्द आणि घेतलेले परिश्रम यामुळे आज ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग मंदिर आणि आवाराचा संपूर्ण कायापालट झाला आहे. संबंधित युवकांच्या या आदर्शवत कार्याची गावकऱ्यांमध्ये मुक्तकंठाने प्रशंसा होत आहे.