बेळगाव लाईव्ह:आमच्या हिंदू -सिंधी जातीची ओळख होण्यासाठी आणि तिला अधिकृत दस्तऐवजीकरणात स्थान मिळण्यासाठी कर्नाटक जात राजपत्रामध्ये हिंदू -सिंधी जातीचा समावेश केला जावा, अशी मागणी शहरातील श्री सिंधी पंचायत भवनने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
श्री सिंधी पंचायत भवन बेळगावचे अध्यक्ष राम जमनानी यांच्या नेतृत्वाखाली सिंधी बांधवांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते सरकार दरबारी पाठवण्याचे आश्वासन दिले.
आम्ही गेल्या 75 वर्षापासून म्हणजे 1947 च्या देशाच्या फाळणीपासून बेळगावात स्थायिक झालो आहोत. फाळणीच्या वेळी जातीमुळे आमच्या समुदायाला त्यावेळी आपल्या राज्याचा त्याग करावा लागला. त्यासाठी आमच्या हिंदू -सिंधी जातीची ओळख होण्यासाठी आणि तिचे अधिकृत दस्तऐवजीकरण गरजेचे आहे असे आम्हाला वाटते.
आमचा सिंधी समाज बेळगाव शहराच्या विकास आणि प्रगतीचा अविभाज्य भाग झाला आहे. आम्हाला अभिमान आहे की आमचा समाज कर्नाटक राज्यासह देशांमध्ये सर्वाधिक कर भरणारा समुदाय आहे. स्थानिक अर्थव्यवस्था आणि समाजातील आमचे योगदानही नाकारता येणार नाही. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपल्या भारताच्या राष्ट्रगीतामध्ये ‘सिंध’ या शब्दाचा अंतर्भाव आहे.
यातून आमच्या समुदायाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्रतिबिंबित होते. या पद्धतीने प्रदीर्घ अस्तित्व आणि योगदान असून देखील आजतागायत कर्नाटक जात राजपत्राच्या यादीत हिंदू -सिंधी जातीचा समावेश करण्यात आलेला नाही. तेंव्हा लवकरात लवकर हिंदू -सिंधी जातीचा कर्नाटक जात राजपत्रात अंतर्भाव केला जावा. जेणेकरून आमच्या समुदायाला समान संधी आणि प्रतिनिधित्व मिळू शकेल, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी श्री सिंधी पंचायत भवनचे अध्यक्ष राम जमनानी यांच्यासह उपाध्यक्ष संतोष वाधवा, सचिव जगदीश कपूरानी, खजिनदार नरेश गिडवाणी यांच्यासह बरेच सिंधी बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या