बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात होणारे गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सण शांततेत पार पाडण्याचे आव्हान बेळगाव पोलिसांसमोर नेहमीच असते. कोणताही अधिकारी जर बदली होऊन बेळगावला आला तर त्याच्यावर गणेशोत्सवाची मिरवणूक शांततेत कशी पार पडली जाईल हीच फार मोठी जबाबदारी असते.
पुणे मुंबई नंतर गणेशोत्सव हा सण देशात बेळगावात सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यासाठी राज्यभरातील पोलीस बंदोबस्तासाठी बेळगावास्तवदाखल होत असतात आणि म्हणूनच पोलिसांसमोर गणेशोत्सवाचा बंदोबस्त ही फार मोठी जबाबदारी दरवर्षी असते.
गेल्या गेल्या दोन दिवसांपूर्वी कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारलेले रोहन जगदीश यांनी देखील बेळगाव दाखल होताचं अनगोळ भागात पाहणी दौरा केला गणेश उत्सव बंदोबस्त कसा शांततेत पार पाडला जाईल याची माहिती जाणून घेतली.
येत्या श्री गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आज रविवारी अनगोळ येथील संवेदनशील भागाचा पाहणी दौरा करण्यात आला.
श्री गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद दरवर्षीप्रमाणे उत्साहात शांततेने पार पडावेत या उद्देशाने टिळकवाडी पोलीस ठाण्याकडून आज अनगोळच्या संवेदनशील भागात पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.
या पाहणी दौऱ्याचे नेतृत्व करणारे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी संवेदनशील भागांची माहिती घेऊन सोबत असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. पाहणी दौऱ्यात टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांसह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग होता.