बेळगाव लाईव्ह:जिल्ह्यात पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी पेरणी वाया गेली असून आगामी काळात पाण्याच्या टंचाईचे सावट आहे.
अशातच दोन खासगी कंपन्यांनी कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी चालवली असून त्याला राज्य सरकारने परवानगीही दिली आहे.
कॅथी क्लायमेट मॉडिफिकेशन कन्सल्टंटस आणि बेळगाव शुगर्स कारखान्याने जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्वखर्चाने हा प्रयोग करण्यात येणार आहे.
त्यासाठी दोन्ही संस्थांनी राज्य सरकारकडे परवागनगी मागितली होती. सरकारने या प्रयोगाला परवानगी दिली असली तरी सर्व प्रयोग जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याच्या सूचना केल्या आहेत.
या कृत्रिम पावसासंदर्भात जिल्हाधिकार्यांनी आवश्यक अहवाल सरकारला सादर करावा, असे आदेश महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी बजावले आहेत.
जिल्हा पावसाअभावी होळपळत असताना आता कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रयोग कितपत यशस्वी होणार, याबाबत उत्सुकता आहे. कॅथी क्लायमेट मॉडिफिकेशन कन्सल्टंटसने याआधी आपण असा प्रयोग यशस्वी केल्याचा दावा केला आहे.
या प्रयोगामुळे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला तर शेतकर्यांसाठी समाधानकारक बातमी असणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.