Saturday, December 21, 2024

/

‘सफर जपानची’ – स्मिता चिरमोरे

 belgaum

जपानी भाषेत जपान या नावासाठी वापरल्या जाणाऱ्या कांजीचा अर्थ ‘सूर्य उगम ‘असा आहे .जपानी भाषेत जपानला’ निहोन ‘ किंवा “निप्पोन’ असे म्हणतात.’उगवत्या सूर्याचा देश’ असा याचा अर्थ आहे.जपान पाहणे खरेच माझे स्वप्न होते की नाही  माहित नाही .पण माझ्या मुलामुळे हे शक्य झाले. गेली चार वर्ष माझा मुलगा सुमेरसिंह एका नावाजलेल्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर रुजू आहे .व त्याचे स्वप्न होते की आपण आपल्या आई-वडिलांना व भावाला जपान दाखवावे .व ते स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले. आज त्याच्यामुळे आम्हाला जपान पाहता आले .ह्याआधी “लव इन टोकियो  ” ह्या चित्रपटातील  एक गाणे… जपान… लव इन टोकियो.. ले गई दिल गुडिया जपान की पागल मुझे कर दिया .हे गाणे ऐकून होते पण प्रत्यक्षात जपान पाहून त्याची प्रचिती आली . खरेच जपान किती सुंदर आहे.

‌आज आपण पुस्तक व प्रवासवर्णनामध्ये जपान बद्दल खूप काही वाचले असेल. पण प्रत्यक्ष पाहिल्यावर जपानचा एक वेगळाच अनुभव येतो व तसा तो आम्हाला देखील आला .इकडचे हवामान जितके चटकन बदलते तितकीच तेथील सुंदरता देखील बदलते.आज मी माझ्या नजरेतून जे काही जपान पाहिले ते मी आपणास माझ्या लिखाणाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करते.

‌          “जपान म्हणजे स्वर्ग “असे म्हटले तर ते वावगे वाटू नये, कारण इथला निसर्ग खूप काही आपणास सांगून व शिकवुन जातो. व जे काही निसर्गाकडे आहे ते भरभरून देण्याचा प्रयत्न करतो. असे वाटते की हा निसर्ग आपल्या डोळ्यांना सुखावणारा आहे. आम्ही गेलो त्यावेळेस नुकताच सकुरा (cherry blossom) हा सिझन चालू झाला होता . त्यामुळे पूर्ण निसर्ग गुलाबी गुलाबी रंगाने बहरला होता .जसे काही ही झाडे गुलाबी रंगाचा वर्षाव करीत होती .जिकडे तिकडे पाहावे तिथे गुलाबी रंगाने भरलेली फुले दिसत होती. असे वाटले की  हा निसर्ग प्रेमाचा वर्षाव करीत आहे. आणि म्हणूनच हे पाहिल्यावर खरंच आपण स्वर्गात आलो की काय हा भास झाल्याशिवाय राहत नाही. आहो स्वर्ग यापेक्षा वेगळा काय असू शकेल.

जपान हा विकसित देश आहे…. हा प्रथम उगवत्या सूर्याचा देश आहे कारण येथे सर्वप्रथम सूर्योदय होतो. त्यामुळे पहाटे चार साडेचार वाजल्यापासून आपल्याला मंद गुलाबी सूर्यप्रकाश पहावयास मिळतो. असे वाटते की ह्या उगवत्या सूर्य बिंबामुळे जसे काही ह्या धरतीने लाल कुंकूच भाळी लावले आहे. आणि हे दृश्य पाहणे हा सर्वात मोठा आनंद आहे .जपानच्या नेऋत्य टोकाकडे क्यूशू बेटाचा उत्तर किनारा आहे व दक्षिणपूर्वेला चिनी समुद्र व पूर्वेस उत्तर पॅसिफिक महासागर आहे. तर उत्तरेस होक्काइडो हे बेट आहे. असे आहे हे जपानचे सौंदर्य.Japan 1

‌        खरेच जपान म्हटले की टेक्नॉलॉजी, जपान म्हणजे आदरातिथ्य, जपान म्हणजे शिस्त, स्वच्छता ,आपुलकी, कामाची ओढ ,नियमबद्ध जगणे व वेळेचे महत्व पटवून देणार हा देश म्हणजे जपान .पण हे पाहण्यासाठी किंवा समजण्यासाठी आपण आयुष्यात एकदा तरी ह्या निसर्गसमृद्ध जपानला भेट दिलीच पाहिजेत.
‌       जपानमध्ये अनेक ठिकाण पाहण्याजोगे आहेत. पण मला मात्र प्रथम तेथील राहणीमान, व्यवहार ,शिस्त ,स्वच्छता व वेळेचे महत्व याबद्दल सांगायला आवडेल.टेक्नॉलॉजीमुळे हा देश आज प्रथम दर्जाचा मानला जातो. तेथील बुलेट ट्रेन  ‘शिनकानसेन’  खरेच …याला जमिनीवरचे विमान म्हटले तर नक्कीच चुकीचे ठरणार नाही. ही शिनकानसेन जपान मधील सर्वात वेगवान रेल्वे म्हणून ओळखली जाते .तासी 300 ते 400 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने धावणारी ही बुलेट ट्रेन त्यात भर म्हणजे जपानच्या वेळेनुसार व त्यांना शोभेल असेच वेळेचे बंधन ..ठरलेल्या वेळेला आपल्यासमोर ही बुलेट ट्रेन उभी राहते .प्रत्येक स्थानकावर पोचण्याची वेळ डिजिटल स्क्रीनवर दिसते .त्यानुसार अनाउन्समेंट देखील केली जाते. जपानमधील सर्वात वेगवान शिनकानसेन (नोझोमी) व त्याचबरोबर हिकारी व कोदामा ट्रेन ,तसेच तोकी _मॅक्स नावाची ट्रेन ही डबल डेकर आहे. शिनकानसेन दर ५ -७ मिनिटाला एक अशा धावतात. त्यामुळे तेथील लोकांची गैरसोय होत नाही. तेथील लोक शिस्तप्रिय असल्याकारणाने कोठेही गर्दी करीत नाहीत.

‌          आम्ही जितके दिवस जपान मध्ये प्रवास केला त्या कालावधीत आम्हाला फक्त दोनदाच गाडीचा हॉर्न ऐकण्यास मिळाला .आश्चर्य वाटले ना? असेच आश्चर्य आम्हाला देखील वाटले .पण हे खरे आहे गाडी चालवणे ही देखील तेथील लोकांची एक शिस्त आहे .ते ओव्हरटेक करीत नाहीत, वेगाला धरून असतात तसेच सिग्नल पडला की दोन गाड्यांच्या  मध्ये कमीत कमी सात ते आठ फुटाचे अंतर ठेवतात .आहे की नाही शिस्त जपानी  लोकांची. हे जर आपणास त्यांच्याकडून शिकता आले तर खरंच आपण देखील खूप पुढे जाऊ  .Japan 2
‌           दुसरी गोष्ट आपण जर रस्त्यावर चालत किंवा सायकल चालवीत असू तर तेथील लोक प्रथम आपणास जाण्यास प्राधान्य देतात. आपण रस्ता क्रॉस केल्याशिवाय ते गाडी चालू करत नाहीत .तसेच जेव्हा आपण गाडीमध्ये चढतो तेव्हा  जी शिस्त , आदरातिथ्य पहावयास मिळते वा ..वा ..वा..  तेथील वाहन चालक आपणास वेलकम म्हणतात व उतरताना धन्यवाद म्हणतात. पण त्यांच्या भाषेमध्ये. याचा अर्थ असा नाही की फक्त एकट्याला किंवा एकदाच म्हणतात. तर जितके प्रवासी गाडीमध्ये चढतात व उतरतात तितक्या सर्व लोकांना ते म्हटले जाते.येथेच त्यांचे लोकांच्या प्रति असलेले प्रेम व आदरातिथ्य आपणास पाहावयास मिळते. तसेच तेथील ट्रेन ड्रायव्हर व हॉटेलचे वेटर देखील याला अपवाद नाहीत.
‌          ट्रेनचे ड्रायव्हर जेव्हा ट्रेन चालू करतात तेव्हा संपूर्ण नियम पाळतात .प्रथम चारी बाजूला पाहिले जाते ,सर्व सिग्नल तपासले जातात मगच ट्रेन सुरू करतात. खरे तर हे दृश्य पाहण्याजोगे असते ….किती ती शिस्त.
‌               इतकेच नाही तर हॉटेलमधील कामगार …लोक जेव्हा हॉटेल मध्ये  प्रवेश करतात तेव्हा त्यांचा आदर करून… आपण जे काही ऑर्डर केली आहे ते काय आहे व काय काय दिले आहे हे समजावून सांगतात. आणि जेव्हा आपण हॉटेलमधून बाहेर पडतो तेव्हा तेथील सर्व कामगार आपणास धन्यवाद म्हणण्यासाठी बाहेर येतात . हीच.. हीच आहे तेथील संस्कृती. हाच तो पाहूनचार आपणास पाहावयास मिळतो.आपण म्हणतो ‘अतिथी देवो  भव ‘ हे आपणास जपान मध्ये पहावयास मिळते. खरे तर ही संस्कृती आपली आहे पण आपण विसरत चाललो आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा या संस्कृतीचा विचार करून आपण ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर खरंच आपल्याकडेही ,’अतिथी देवो भव,” ही संकल्पना खरी करू शकू.Japan 3

‌             तेथील शॉपिंग मॉल मध्ये आपण आपले बिल मशीनद्वारे करू शकतो .पण हे करीत असताना आपण स्वतः जे काही कपडे खरेदी केले असतील ते मशीनच्या बॉक्समध्ये ठेवावे लागतात.तर दुसऱ्याच क्षणी आपण  घेतलेली वस्तूची संख्या व किंमत आपल्यापुढे येते . ना कोणी आपल्यावर लक्ष ठेवून असते ना कोणी फसविण्याचा प्रयत्न करते. फक्त आणि फक्त विश्वास महत्त्वाचा आहे .येथे आपणास फारसे कामगार दिसणार नाहीत. मोठ मोठ्या मॉलला दरवाजे देखील नाहीत हो… फक्त एका दोरीने समोरच्या बाजूला बांधले की झाले मॉल बंद .आहे की नाही गंमत .ना वॉचमन ना चोरीची भीती कारण तेथील नियम अतिशय कडक आहेत .ते नियम लोकांच्याकडून व्यवस्थित पाळले जातात .आणि म्हणूनच आपल्याला तेथे बरेच ठिकाणी पोलीस दिसत नाहीत.
‌              दुसरे ठिकाण म्हणजे फॅमिली मार्ट .ही जपानी सुविधा स्टोअर  फ्रेंचायझी चेन आहे. ही 7 11 च्या मागे जपानची दुसरी सर्वात मोठी सुविधा स्टोअर आहे. जी 24 तास सुरू असते. त्यामुळे सर्व लोकांना खूप सोयीस्कर पडते. इथे आपणास कॉफी, किराणामाल, फुले, भाज्या, स्नॅक्स मिळतात. तसेच आपणास जेवणाचे बॉक्स तयार भेटतात जेणेकरून तेथील लोक   आपले काम संपून येताना ते जेवणाचे बॉक्स घेऊ शकतात. अतिशय पौष्टिक व स्वच्छ असल्याकारणाने ते खूप फायदेशीर पडते.
‌               आणखीन एका शॉपचे वर्णन करावे असे वाटते ते म्हणजे 100 एन स्टोअर. ही देखील खूप छान सोय जपानने केली आहे. येथे आपणास 100 यनला अनेक महत्त्वाच्या तसेच गरजेच्या वस्तू भेटतात .हे एक प्रकारचे डिस्काउंट स्टोअर आहे .जे कोणी नवीन रहिवासी किंवा प्रवासी असतील त्यांना आपल्या  बजेटचे एक उत्तम स्तोत्र आहे. कारण प्रत्येक वस्तूची किंमत शंभर एन असल्यामुळे आपण आपल्या गरजेनुसार वस्तू घेऊ शकतो. उदाहरणार्थ प्लेट्स ,वाट्या, चप्पल ,पेन , टॉवेल, मोजे, ताट, छोटी भांडी इत्यादी.
‌.        आता मी तेथील लोकांच्या बद्दल थोडी माहिती सांगण्याचा प्रयत्न करते .तेथील लोक खरेच खूप शांन्त ,आदरयुक्त ,कामाचे पक्के .ते कोणालाही आपल्यामुळे त्रास होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतात. समोरच्या व्यक्तीचा आदर करणे एवढेच त्यांना माहीत. ते फक्त आपल्या कामाचा ,वेळेचा विचार करतात. स्वतःला कामांमध्ये गुंतवून घेणे पसंत करतात .किमान नऊ ते दहा तास ते काम करतात .त्यांचे आपल्या मातृभूमीवर व भाषेवर अतिशय प्रेम आहे .ते लोक विनम्रवृत्तीचे ,विचारशील व संस्कृतीवर मनापासून प्रेम करणारे आहेत. आपल्यालाही असे करणे काही अवघड नाही.असो…
‌  असे म्हणतात सर्वाधिक आयुर्मान असणारे लोक म्हणजे जपानीलोक .आणि हे खरे आहे .याचे रहस्य त्यांचा आहार , योग्य व्यायाम व भरपूर चालणे .Japan 4
‌         जपानी आहार हा जगात सर्वोत्तम मानला जातो. मासे हा प्रमुख आहार. ते चपाती व ब्रेड ऐवजी भाताला प्राधान्य देतात. तसेच गोड पदार्थ पासून दूर राहणे पसंत करतात .त्या व्यतिरिक्त ते ग्रीन टी चे सेवन करतात त्याला ते ‘माचा’ म्हणतात .हे पेय जपानी लोकांना खूप आवडते .हे प्यायल्याने वजन तर कमी होतेच पण वय देखील फारसे दिसून येत नाही. पुन्हा त्यांच्या चालण्यामुळे त्यांची तब्येत व वजन  संतुलित ठेवण्यास मदत होते . आणि म्हणूनच जपानी लोक खरेच खूप बारीक व नाजूक दिसतात.
‌        ‌  जपानची मुद्रा येन आहे. जपान विजेचे उपकरण, इलेक्ट्रॉनिक्स ,मशीन टूल्स, ऑप्टिकल ,सटिक उपकरण, मशीन ,जहाज ,ऑटोमोबाईल, रसायन निर्माण करण्यात प्रथम आहे. ह्याव्यतिरिक्त त्यांचा पारंपरिक पोशाख हा किमोनो आहे. ह्या पोशाखात ते लोक खूप सुंदर दिसतात.
‌           आता आपण तेथील स्वच्छता बद्दल थोडे पाहू. जपानची स्वच्छता याबद्दल जेवढे सांगावे तेवढे कमीच .असे म्हणतात  की तेथील रस्त्यावर बिना ताट आपण जेवू शकतो. खरेच वाचून आश्चर्य वाटले ना ?… मला देखील असेच वाटले होते पण जेव्हा पाहिले तेव्हा पटले. खूपच स्वच्छता आपणास जपान मध्ये पहावयास मिळते. रस्त्यावर किंवा आजूबाजूला थोडी देखील घाण किंवा कचरा आपणास दिसणार नाही .याची दक्षता जपान व जपानी लोक घेतात. जपान निसर्गसमृद्ध देश आहे. आजूबाजूला भरपूर झाडे तरी देखील झाडाचा कचरा पाचोळा पाहण्यास मिळणार नाही.  तेथील लोक स्वतःचा कचरा स्वतः हातात घेऊन किंवा बँगेत ठेवून घरी किंवा कचरा पेटीतच टाकतात. खरे तर रस्त्यात आपणास कचरापेटी भेटत नाही तर ती फक्त रेल्वे स्टेशनवरच मिळते. आणि जर का आपण कचरा रस्त्यावर टाकला तर त्यावर भरपूर फाईन बसतो .
‌                  तसेच जपानच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला फॅमिली मार्ट  मिळतात. फॅमिली मार्ट  हे एक  जीवनरक्षक आहे. त्यांचे विनामूल्य सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत .ती अतिशय स्वच्छ आहेत. तसेच या स्टोअर्स मध्ये आपणास न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण हे सर्व काही मिळते. जपानी फूड हे खरे अन्न आहे .अगदी घरासारखे ताजे बनलेले .असे म्हटले जाते की हे बजेट फ्रेंडली अन्नाचे घर आहे. जपानी  बेटो बॉक्स हे एक दुपारचे जेवण तसेच डिनर आहे .हे निरोगी व स्वच्छ आहे. हवे असल्यास लगेच गरम करून दिले जाते.

आता तेथील काही ठिकाणाची थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करते.

‌             टोकियो –‘टोक्यो’  ही जपान देशाची राजधानी .येथे जपानचे राजे यांचा शाही बंगला आहे .झाडांच्या दाट हिरवाईत जपानच्या सम्राटांचा राजवाडा कालवे ,खंदक आणि प्राचीन भिंतीने वेढलेला आहे  .आपण त्या एरिया मध्ये बाहेरून फेरफटका मारू शकतो .येथील टोक्यो टॉवर हा एप्रिल टॉवर पेक्षा 13 मीटर उंच आहे. इथे आपणास मोठ -मोठ्या बिल्डिंग तसेच अनेक प्रकारच्या  मोठ्या गाड्या ( फोर व्हीलर) पाहण्यास  मिळतात.
‌              माउंट फुजी—-माउंट फुजी हे पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यातील दुवा मानला जातो. हा सर्वात उंच पर्वत आहे .तसेच हा एक जागृत ज्वालामुखी असून त्याचा 1708 सारी उदे्क झाला आहे. जगातील व जपान मधील सर्वात सुंदर नैसर्गिक स्थान असे मानले जाते. पर्वताच्या आत ज्वालामुखी व बाहेरील बाजूस पूर्ण बर्फ असलेली जागा. खरेच हे जगातील आश्चर्य  मानायला हरकत नाही.
‌.          हाकोने—-हाकोने हे क्षेत्र नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे .तिथून आपणास माऊट फुजीचे भव्य दर्शन होते. व येथील हिरवीगार जंगले, हॉट स्प्रिंग बाथ, हायकिंग,बोटिंग, सायकलिंग हे आकर्षणे आहेत.
‌       ओवाकुडानी—ज्वालामुखीचे खोरे ..ओवाकुडानी हे एक सक्रिय ज्वालामुखी क्षेत्र आहे. जेथे गंधक युक्त धुके ,गरम पाण्याचे झरे, गरम पाण्याच्या नद्या आहेत .येथे ओवाकुडानीच्या हॉट स्प्रिंग पुल मध्ये उकडलेले अंडे गंधकाने  काळे केलेले असून ते खाल्ल्याने एखाद्याचे आयुष्य सात वर्षांनी वाडू शकते. जपानमधील सक्रिय सल्फर व्हेट्स व गरम पाण्याचे झरे असलेली कानागावा ज्वालामुखी दरी आहे .हे पाहण्यासाठी आपण रोपवे , ट्रेन किंवा केबलकारणे देखील जाऊ शकतो.
‌.              हाकोने निसर्गसमृद्ध आहे .सर्वात लोकप्रिय ओवाकुडानी व्हॅली जी ज्वालामुखीच्या उद्रेकदरम्यान तयार झाली आहे. 1044 मीटर उंचीवर गेल्यावर आपणास ज्वालामुखीच्या हालचाली पाहण्यास मिळतात.
‌.           ओसाका –येथे सर्वात उंच डोंगरावर  देऊळ आहे. अतिशय सुंदर निसर्ग आपणास पहावयास मिळतो  . सर्वात उंच इमारत ओसाका  येते आहे. या ठिकाणी आपणास जपानी लोक त्यांच्या पेहरावामध्ये पाहण्यास मिळतात. अनेक कलर ,वेगवेगळे डिझाईन मध्ये आपल्याला किमोनो दिसतात .खूप सुंदर दिसतात .तसेच हे ठिकाण ‘ओसाका  ‘ही जपानची फूड कॅपिटल म्हणून प्रसिद्ध आहे. वेगवेगळे खाद्यपदार्थ आपणास येथे मिळतातJapan 1
क्योटो—-हे बौध्द व  शिंटो  मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. येथील सर्वात सुंदर जागा म्हणजे रॉक गार्डन.
‌.           नारा—-नारा येथे संग्रहालय आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्मारके आहेत. एकेकाळी ही राजधानी होती. पण आता येथे ऐतिहासिक मूल्यांच्या अद्वितीय इमारती पाहण्यास मिळतात. येथे मोठे पुशीमीइनारी मंदिर आहे.
‌.            तसेच नारा हे 🦌  Deer park म्हणून देखील प्रसिद्ध आहे. येथील हरण देखील आपणास मान खाली वाकवून आदर करतात .हे दृश्य पाहण्यासारखे असते.
‌.         ओडाइडा- Aqua city Odaida… इथे आपणास टूलिप गार्डन पाहण्यास मिळते .खूप सुंदर पार्क आहे .येथून आपण इंद्रधनुष्य   फुलावर उभे राहून टोकियो महानगरचे केंद्र पाहू शकतो .तसेच आपणास इथे ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ‘पाहता येते. हे एक मोठे शॉपिंग झोन देखील आहे.
ओडाइडा इथे आपणास लूप ट्रेन भेटते.  म्हणजेच  बिना ड्रायव्हर रेल्वे पाहावयास  मिळते. जेव्हा आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, ट्यूलिप  गार्डन पाहण्यास जातो तेव्हा या ट्रेनचा वापर करू  शकतो. ही ट्रेन जरी बिना ड्रायव्हर असली तरी जितकी स्टेशन येतात तेथे व्यवस्थित थांबते. आपोआप दरवाजे उघडतात लोक बसतात पुन्हा दरवाजे बंद होतात.. असे वाटते की  ..ह्या ट्रेनचे ड्रायव्हर आपणच आहोत. एवढेच नाही तर ही ट्रेन रस्त्याच्या वरून म्हणजेच ब्रिज वरून धावते. आणि ह्या ट्रेनमध्ये बसून आजूबाजूचे दृश्य पाहणे, निसर्ग पहाणे खरोखरच खूप मज्जा वाटते. खाली रस्त्यावर गाड्या  मध्ये आपली ट्रेन आणि वर आकाशात विमान खरंच हे दृश्य पाहण्यासारखे असते.

नबाना  नो साटो— अतिशय सुंदर ठिकाण.. काय आणि कसे वर्णन करावे समजत नाही .जसे काही स्वर्गच आहे असा भास होतो.
‌.       गुलाब गार्डन –किती ते गुलाब प्रत्येक गुलाबाचा रंग वेगळा  .अनेक आकाराची व कलरचे गुलाब आपणास पाहण्यास मिळतात .असे वाटते की  तेथून बाहेर पडूच नये. पुन्हा येते देखील आपणास गरम पाण्याचे झरे पाहण्यास मिळतात. गरम पाण्यात  पाय शेकता यावे याकरता खूप सुंदर सोय केली आहे .संपूर्ण झऱ्याकाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. नबाना नो साटो येथे अनेक प्रकारची व आकाराची झाडे आपणास पाहता येतात . संध्याकाळी या संपूर्ण गार्डनला व झाडांना लाइटिंग केले जाते ते  पाहण्याची मज्जा काही वेगळीच आहे. जसे काही स्वर्गच खाली आला आहे व आपण त्या स्वर्गाचा आनंद मनसोक्त घेत आहोत असे वाटते .येथील लाईट शोमध्ये बोट, मासा, झेंडा हे सर्व आपले लक्ष वेधून घेतात. संपूर्ण गार्डन वेगवेगळ्या कलर लाईटनी बहरुन निघते. जपानमध्ये थंडी असल्याकारणाने काही अंतरावर आपणास शेकोटीची व्यवस्था केलेली पाहण्यास मिळते. साऱ्याच  लोकांचा विचार करून त्यांना जे हवे नको हे पाहून त्यांची सोय येथे करण्यात आली आहे.Japan 2
‌.         हिरोशिमा—अणुबॉम्बचा हल्ला झालेले हे पहिले शहर. दुसऱ्या महायुद्धामध्ये परमाणुबॉम्बचा हल्ला झाला होता. एनोला ग्रे नावाच्या बी 29  प्रकारच्या विमानाने ‘लिटल बॉय’ असे नामकरण केलेले  बॉम्ब ह्या शहरावर टाकला . यात हिरोशिमा बेचिराख  झाला होता.अतिशय दुःखद घटना घडली .येथील हिरोशिमा  पीस मेमोरियल  (Genbaky Dome)फक्त काही प्रमाणात शिल्लक आहे.ते आपणास अजूनही पाहता येते. पण आज देखील बऱ्याचश्या आठवणी जपाननी  जपून ठेवल्या आहेत.पण आता हिरोशिमा  जपान मधील एक मोठे शहर बनले आहे.
आराशिंमा—हे फार मोठे बांबू फॉरेस्ट आहे .खूप सुंदर आहे.हे एक नैसर्गिक जंगल आहे पण  पाहिले की असे वाटते की मनुष्याने  ही झाडे लावली असावी. इतकी सुंदर आणि रेखीव ..एका ओळींमध्ये आपल्याला पहावयास मिळतात .अतिशय मोठी झाडे आपणास पाहण्यास मिळतात. पण हे पाहत असताना तेथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून चालत नाही .खरंच हे एक बांबू जंगल असून  देखील अतिशय स्वच्छ आहे .यावरून आपणास जपान मधील स्वच्छता  कशी आहे याचा अंदाज नक्कीच घेता येतो.
‌.           युनिव्हर्सल स्टुडिओ—-हे ओसाका जपान येथे स्थित आहे .ही एक थीम पार्क आहे. हे जगभरातील सहा युनिव्हर्सल स्टुडिओ थीम  पैकी एक आहे. इथे आपणास अनेक राईडचा मनसोक्त आनंद  लुटता येतो . त्या पैकी काही राईडची थोड्या प्रमाणात मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करते.
‌फ्लाइंग डायनासोर—-ही राईड अतिशय भयानक पण तितकीच उल्हासदायक  आहे. ही तुम्हाला मागून पकडेल  व उंच आकाशात खेचते .तुमच्या  व जमिनीमध्ये फक्त आणि फक्त हवेच्या व्यतिरिक्त काहीही नाही. हो खरेच..ओव्हर  – द- टॉप थरारक व अतिशय रोमांचकारी अनुभव आहे .हा तुम्हाला ज्युरासिक पार्कच्या 360 अंशावर फिरवतो. फ्लाईंग डायनासोर हे युनिव्हर्सल स्टुडिओ मधील फ्लाईंग रोलर कोस्टर आहे.
स्पायडरमॅन राईड —हो खरे.. हे एक आश्चर्यकारक साहस आहे . ही देखील एक डार्क राईड आहे . या राईडचा आनंद तो घेतल्याशिवाय समजत नाही. काही गोष्टी सांगून कळत नाहीत तर प्रत्यक्षात अनुभव घ्यावा लागतो.
हॅरी पॉटर—ही युनिव्हर्सल स्टुडिओ जपानमध्ये चालणारी उच्च श्रेणीची डार्क राईड आहे. ज्यामध्ये हॅरी पॉटरची पुस्तके आणि चित्रपटाची मालिका प्रेरित दृश्ये आहेत.
जुरासिक पार्क … ही राईड पाण्यावर आधारित व मनोरंजक राईड आहे .ही जपानमध्ये चालणारी उच्च दर्जाची वॉटर राईड आहे ज्याचा आनंद आपण मनसोक्त घेऊ शकतो . जितकी भयानक तितकीच मनोरंजनक राईड आहे.
खरेच जपान मध्ये बरंच काही पाहण्यासारखे आहे. पण ते आपल्याला पुस्तक वाचून तेथील माहिती मिळू शकते . म्हणूनच मला जपान पाहिल्यावर  फक्त आणि फक्त तेथील संस्कृती, स्वच्छता ,राहणीमान ,पाहुणचार, आदरातिथ्य ,कामाचे वेड ,वेळेचे महत्व ,तेथील प्रगत टेक्नॉलॉजी या गोष्टीने लक्ष वेधलं. खरेच या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि म्हणून मला फक्त हेच आपल्यापुढे मांडायचे होते . त्यासाठी मी हे लिहिण्याचा प्रयत्न केला. व पुन्हा एकदा मला आपणास सांगावे वाटते की खरेच आपण आयुष्यात एकदा तरी जपानला भेट देऊन तेथील जे काही आहे शिकण्यासारखे ते शिकण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आपण देखील त्या प्रगत देशाप्रमाणे थोडीफार प्रगती करू शकू…… धन्यवाद.
‌             सौ. स्मिता सतिश चिरमोरे.
‌             सुभाषचंद्रनगर, टिळकवाडी बेळगाव.
‌           मो. नं .9449969255

कुणालाही जपानची सहल करायची असल्यासनक्की संपर्क करा : प्रतीक टूर्स बेळगाव संपर्क : +91 97396 00050

 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.