Friday, July 19, 2024

/

लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या ‘त्या’ कार्यवाहीचे नागरिकात स्वागत

 belgaum

बेळगाव लाईव्ह:लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज बुधवारी दुपारी बेळगाव दक्षिण सब रजिस्ट्रार अर्थात उपनोंदणी कार्यालयाला अचानक भेट देऊन केलेल्या कार्यवाहीसह उप नोंदणी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घेतलेल्या झाडाझडतीबद्दल नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.

अलीकडच्या काही वर्षांत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याने नेमक्या कोणत्या तक्रारी आहेत हा प्रश्न समोर आला आहे.
बेळगाव दक्षिण उप नोंदणी कार्यालयाच्या बाबतीत असंख्य तक्रारी असून हे कार्यालय म्हणजे गैरकारभार व भ्रष्टाचाराचे आगर असल्याचा आरोप केला जातो.

एका नामांकित वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार सदर कार्यालयात आपल्या जमिनीच्या अथवा मालमत्तेच्या कामासंदर्भात आलेल्यांची अक्षरशः लूट केली जाते. उप नोंदणी कार्यालयांमध्ये मालमत्ता अथवा जागेसंदर्भात वस्तुनिष्ठ माहिती नोंद करून त्याप्रमाणे त्याचे मूल्यांकन (व्हॅल्युएशन) केले जाते. मात्र सदर कार्यालयात बक्कळ पैसा घेऊन खोटी माहिती नोंद करून घेण्याद्वारे कमी मूल्यांकन उपलब्ध करून दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. उदाहरणार्थ हजारो रुपयांच्या मोबदल्यात 50 फुटाचा रस्ताची 30 फूट अशी नोंद करून मूल्यांकन कमी करून दिले जाते.

साधा 30 बाय 40 चा भूखंड असेल तर त्याचे मूल्यांकन कमी करून देण्यासाठी 70 ते 80 हजार रुपये उकळले जातात. कागदपत्र वगैरे सर्व काही चोख बरोबर असले तरी साहेबांना पैसे द्यावेच लागतात असे सांगून या उपनोंदणी कार्यालयातील कर्मचारी किमान 10 हजार रुपये तरी उकळतातच असे बेळगाव दक्षिण उप नोंदणी कार्यालयाची झळ सोसलेल्याकडून समजते.Sub registrar

सदर कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचे आगर असून आज लोकायुक्त अधिकाऱ्यांनी या कार्यालयाला अचानक भेट देऊन केलेल्या चौकशीचे नागरिकात स्वागत होत आहे. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी उपनोंदणी अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली हे अतिशय उत्तम झाले अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

त्याचप्रमाणे एवढ्यावर न थांबता लोकायुक्तांनी पुन्हा एक दिवस थेट धाड टाकून बेळगाव दक्षिण उप नोंदणी कार्यालयातील गैरकारभार चव्हाट्यावर आणावा आणि भ्रष्ट उप नोंदणी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.