पाॅलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईड आणि सेंट पॉल्स हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे यंदाचा 56 वा स्वातंत्र्य दिन आजादी का अमृत महोत्सवानिमित्त येत्या 15 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिरासह त्यानंतर 1 सप्टेंबर 2023 पासून प्रतिष्ठेच्या फादर एडी स्मृती चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पाॅलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईडचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांनी दिली.
कॅम्प येथील सेंटपॉल्स हायस्कूल येथे आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. डॉ. माधव प्रभू म्हणाले की, पाॅलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईडतर्फे यंदा महत्त्वाचे दोन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिला उपक्रम म्हणजे येत्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सेंट पॉल्स हायस्कूल आवारात होणाऱ्या या शिबिरासाठी आम्ही 200 रक्तदात्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे याच दिवशी आम्ही आमच्या सेंट पॉल्स शाळेच्या शिक्षकवर्गाची तज्ञ डॉक्टरां करवी आरोग्य तपासणी देखील करणार आहोत. त्याचप्रमाणे रक्तदान संदर्भात अत्यंत उल्लेखनीय सेवा करणारे शाळेचे माजी विद्यार्थी संतोष दरेकर यांचा सत्कारही केला जाणार आहे.
याखेरीज शहरातील सर्वात जुन्या, गेली 55 वर्षे सुरू असलेल्या फादर एडी स्मृती चषक फुटबॉल स्पर्धेचे यंदा मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाणार आहे. सदर स्पर्धेसाठी आम्ही मातब्बर 20 संघांना निमंत्रित केले आहे. बाद पद्धतीने खेळविली जाणारी ही स्पर्धा 1 ते 6 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेच्या प्रत्येक दिवशी समाजात उच्च पदावर असलेल्या चांगला नावलौकिक मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले जाणार आहे. सुप्रसिद्ध व्यावसायिक ब्रॉडबँड मालक नागेश छाब्रिया व सुमुख छाब्रिया हे यंदाच्या या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते असणार आहेत असे सांगून उपरोक्त दोन्ही उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. प्रभू यांनी केले.
पत्रकार परिषदेस सेंट पॉल्स हायस्कूलचे प्राचार्य फादर डॉ. सेव्हिओ एम्ब्रू, फादर फर्नांडिस, अनिकेत क्षत्रिय, क्रीडा समितीचे चेअरमन अमित पाटील यांच्यासह पाॅलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईड आणि सेंट पॉल्स हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.