मानसिक अवस्थातून तीन महिन्यांपासून बेपत्ता झालेली शहापूर, वडगाव रयत गल्ली येथील महिला अखेर सामाजिक कार्यकर्ते आणि सोशल मीडियाच्या जागृतीमुळे परत आली.
बुलढाणा येथील दिव्य फाऊंडेशन दिव्य सेवा प्रकल्पाच्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केला असून तिला बेळगावात आणून सोडण्यात आले आहे.
रेखा सांबरेकर या रयत गल्लीतील महिला मानसिकदृष्ट्या कमकुवत होती. त्यातूनच त्या तीन महिन्यांपासून बेळगावातून बेपत्ता झाल्या. शहापूर पोलिस ठाण्यात त्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. घरातील लोकांनी तिचा अनेक ठिकाणी शोध घेतला.
सोशल मीडिया आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. पण, त्या महिलेचा थांगपत्ता लागत नव्हता. पण, दोन दिवसांपूर्वी बुलढाणा येथील दिव्य फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांनी बेळगावात सामाजिक कार्यकर्त्यांना फोन केला. त्यानंतर सदर महिलेबाबत माहिती मिळाली.
रेखा सांबरेकर या बेळगावातून बेपत्ता होऊन लातूर येथे मनोरूग्ण अवस्थेत भटकत असल्याचे आढळून आले होते. त्याठिकाणी बुलढाणाच्या या संस्थेच्या पदाधिकार्यांनी महिलेला बुलढाणा येथे नेले. त्याठिकाणी उपचार केले. डॉ. अशोक काकडे आणि विशाल ग्यारल यांनी तिच्यावर उपचार केले. ती बरी झाल्यानंतर तिने आपण बेळगाव येथील असल्याचे सांगितले.
त्यानंतर फोनाफोनी सुरू झाली. बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते हभप शंकर बाबली महाराज यांनी या कार्यात पुढाकार घेऊन महिलेचा पत्ता शोधून काढण्यात आला. त्यानुसार सदर महिला वडगाव, शहापूर रयत गल्ली येथील असल्याचे समोर आहे. त्यानुसार फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांनी बेळगाव आणून तिला सोडले.
तब्बल तीन महिन्यांनंतर ती बेळगावला सुखरुप परत आली आहे. त्यामुळे घरच्यांनी सुटकेचा निश्व:स सोडला आहे. शहापूर पोलिस ठाण्यात चौकशी आणि नोंदीनंतर तिला घरी नेण्यात आले. रेखा यांना पती,एक मुलगा दोन मुली असा परिवार असून देवगणहट्टी हे तिचे माहेर आहे.