चांगली वर्तणूक व कामात सुधारणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलीस आयुक्तालयाकडून यंदा शहरातील तब्बल 167 जणांची नावे ‘रावडी शीट’ अर्थात गुन्हेगारी यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे पूर्वाश्रमीचे गुन्हेगार असलेल्या संबंधितांना दिलासा मिळाला आहे.
गुन्हेगारी सोडलेल्या अनेक जणांकडून आपल्याला विनाकारण गोवले आहे, पूर्वी गुन्हे करायचो आता सुधारलो आहे, तरीही पोलीस सण, उत्सव, निवडणुकीत ओळख परेडसाठी बोलावतात. हजेरीसाठी धाक दाखविला जातो. प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत सूचना केल्या जातात, अशा तक्रारी होत्या.
या तक्रारींची दखल घेत राज्य शासनाकडून गेल्या वर्षी 17 जानेवारी 2022 रोजी गुन्हेगारांच्या यादी बाबत सुधारित आदेश जारी करण्यात आला आहे. त्या आदेशानुसार यंदा 2023 मध्ये शहरातील 167 जण तर जिल्ह्यातील 185 जणांची नावे गुन्हेगारी यादीतून वगळण्यात आली आहेत.
राज्य शासनाने गेल्या वर्षी गुन्हेगारांच्या यादीबाबत जारी केलेल्या सुधारित आदेशामध्ये 65 पेक्षा अधिक वय आणि निष्क्रिय व्यक्तीची नावे यादीतून वगळण्यात यावीत. असहाय्य आणि मृत्यू, दिव्यांग, मानसिक अस्वस्थ व गेल्या 10 वर्षात कोणत्याही स्वरूपात गुन्हा दाखल न झालेल्या आणि चांगले वर्तन आढळून येणाऱ्यांची नावे वगळण्याचा उल्लेख आहे.
त्या निकषानुसार मागील चार वर्षापेक्षा यंदा 7 -8 पटीने अधिक जणांची नावे रावडी शीट मधून कमी करण्यात आली आहेत. यामुळे पूर्वाश्रमीचे गुन्हेगार असलेल्या संबंधित सर्वांना दिलासा मिळाला असून ते पोलीस प्रशासनाला धन्यवाद देत आहेत.