बेळगाव लाईव्ह:ज्येष्ठ विचारवंत आणि संशोधक प्रा. हरि नरके यांचे हृदयाघाताने बुधवारी दिनांक 9 रोजी निधन झाले. त्यांचे बेळगावशी ऋणानुबंध होते.
सर्वात जुने असलेल्या बेळगावातील सार्वजनिक वाचनालयातील वक्तृत्व स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे विजेते ते बॅ. नाथ पै व्याख्यान मालेतील वक्ते असा त्यांचा प्रवास बेळगावकरांनी पाहिला आहे. त्यांच्या जाण्याने अनेकांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
विद्यार्थी दशेत असताना प्रा. नरके यांनी सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या वकृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामध्ये त्यांचा पहिला क्रमांक आला होता. त्यानंतर दोन वेळा ते बॅ. नाथ पै व्याख्यान मालेत वक्ते म्हणून सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्या जिज्ञासूवृत्तीचा आणि आयुष्याचा चढता आलेख लक्षात येतो.
प्रा. नरके हे कडोली येथील साहित्य संमेलनात आले होते. याशिवाय दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमांतही त्यांनी मार्गदर्शन केले होते. तर 9 डिसेंबर 2018 रोजी सांबरा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रा. नरके सहभागी झाले होते.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र सरकारला जो अहवाल पाठवला होता मराठी भाषेची सुरुवातीपासूनची संपूर्ण माहिती अहवाल केंद्र सरकारला पाठवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांना बेळगावकरांच्या विषयी विशेष तळमळ होती. त्यांच्या जाण्यामुळे बेळगावकरांनाही दु:ख झाले आहे.
पुरोगामी विचार सरणी च्या प्रा. हरी नरके यांचा वंचित घटकांना मोठा आधार होता प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या बुध्दी चातुर्याने वाक कौशल्याने एका महत्त्वपूर्ण मुक्कामा पर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी झाले होते.त्यांच्या संशोधकिय लेखणीने अनेकांचे बुरखे फाडण्याचे काम केले होते अनेक संस्थांवर ते कार्यरत होते अश्या विदुषी व्यक्तिमत्त्वाला टीम ‘Belgaum Live- बेळगांव लाईव्ह ‘ कडून मानाची आदरांजली..