बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व तयारी करावी, तसेच उत्सव मंडळांना विनाविलंब एक खिडकी योजनेच्या माध्यमातून तत्काळ परवानगी द्यावी, अशा सूचना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकार्यांना दिल्या.
गणेशोत्सवानिमित्त महापालिकेच्या सभागृहात सोमवारी (7 ऑगस्ट) झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज देण्याकडे शासनस्तरावर लक्ष दिले जाणार आहे. काही समस्या असतील तर त्या अधिकार्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, त्या सोडवल्या जात नसतील तर आवश्यक क्रम घेण्यात येतील, असेही ते म्हणाले. गणेशोत्सव मंडळांनीही ठरलेल्या वेळी मिरवणुकीत सहभागी होऊन लवकरात लवकर विसर्जनासाठी सहकार्य करावे, अशी विनंती जारकीहोळी यांनी केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व तयारी सुरू आहे. खड्डे साफ करणे, रस्त्यांची दुरुस्ती, वीजवाहिन्या साफ करणे, पोलिस बंदोबस्त व इतर आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
सतीश जारकीहोळी यांनी, मिरवणूक पाहण्यासाठी येणार्या महिलांच्या सोयीसाठी अधिकाधिक महिला स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना केल्या.
महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात येणार आहे.
महापालिकेकडून एक कोटी अनुदान
जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, गणेशोत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी महापालिकेकडून एक कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
गणेशोत्सव मंडळांना परवाने वाटपासाठी आठ पोलिस ठाण्यांमध्ये एक खिडकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. मिरवणूक पाहण्याची प्रेक्षा गॅलरी उभारण्यात येणार आहे. मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था आणि सीसीटीव्ही बसवले जातील.
गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी विकास कलघटगी यांनी, शहरातील 378 गणेशोत्सव मंडळे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत आहेत. त्यामुळे वीज बिलात सवलत द्यावी. शक्य असल्यास संपूर्ण बिल माफ करण्याबाबत शासनस्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.
नेताजी जाधव यांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी वडगाव मंगाई नगर येथे तलावात विसर्जन व्यवस्था करावी कारण नाझर कॅम्प वडगाव येथील तलाव असुविधा असल्याचे सांगत विहिरीची व्यवस्था करावी. विद्युत दिवे लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी पावले उचलावीत, अशी विनंती केली.
रमाकांत कोंडुसकर यांनी मंडळांना मोफत वीज देण्याबरोबरच परवानाप्रणाली सुलभ करावी, अशी विनंती केली. सागर पाटील यांनी शहापूर भंगी बोळातील खुदाई रस्ते दुरुस्ती स्मार्ट सिटी लाईट मुळे त्रास होत असल्याचे सांगितले.
यावेळी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, आमदार आसिफ (राजू) सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर आदी उपस्थित होते.
मल्लेश चौगले, विजय जाधव सुनील जाधव आदींनी महत्वपूर्ण सूचना केल्या. या बैठकीत बेळगाव शहरातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, महानगर पालिकेचे सदस्य, मान्यवर, विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.