बेळगाव शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु या राष्ट्रपुरुषांच्याविषयी अत्यंत हीन पातळीवरुन लांच्छनास्पद वक्तव्ये केली आहेत. भारताला मिळालेले स्वातंत्र्यही ते मानत नाहीत. १५ ऑगस्ट रोजी काळा दिवस पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
त्यांचे हे वक्तव्य राज्यघटनेचा अवमान करणारे आणि देशविरोधी असल्याने त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी झालेल्या विविध संस्था व संघटनांच्या बैठकीत करण्यात आली.
या मागणीचे निवेदन शुक्रवार दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते अँड. राजाभाऊ पाटील होते.
प्रा. आनंद मेणसे यांनी प्रास्ताविकात भिडे यांनी केलेल्या वक्तव्याची माहिती देऊन या विरोधात संघटितपणे आवाज उठविण्याची गरज प्रतिपादन केली.यानंतर बोलताना कामगारनेते अँड. नागेश सातेरी यांनी भिडे यांचे वक्तव्य हे षडयंत्र आहे. ते देशहितासाठी हाणून पाडले पाहिजे, असे सांगितले.
मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते शंकर चौगुले, गोपाळ कातकर, सतिश देसाई यांनी विचार व्यक्त करताना भिडे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला.
अध्यक्षीय भाषणात अँड. राजाभाऊ पाटील यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा केवळ निषेध करून चालणार नाही. तर याविरोधात समाज प्रबोधन केले पाहिजे. आपण स्वस्त बसून चालणार नाही, असे सांगितले.
येत्या काही दिवसात शहर व तालुक्यात विभागवार मेळावे घेऊन समाज प्रबोधन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.सह्याद्री को-ऑप. सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस विविध क्षेत्रातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.