बेळगाव लाईव्ह :शेतकर्यांनी प्रचंड विरोध करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेतकर्यांच्या आक्षेपांना केराची टोपली दाखवली आहे. रिंगरोडसाठी अधिसूचना काढली असून शेतकर्यांच्या जमिनीवर पुन्हा संकट ओढवले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेतकर्यांनी नोंदवलेल्या आक्षेपांची दखल घेतली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष भूसंपादनाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी 4 ऑगष्ट रोजी टाइम्स ऑफ इंडिया या
इंग्रजी वृत्तपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये 16 गावातील 2021854 चौरस मीटर जमीन संपादित केली जाणार आहे.
रिंगरोडला शेतकर्यांनी प्रखर विरोध दर्शविला असून रस्त्यावरची लढाई केली आहे. याशिवाय लेखी आक्षेप नोंदवले आहेत. 1200 पैकी 950 हून अधिक सर्व्हे क्रमांकातील शेतकर्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आक्षेप नोंदवले आहेत. पण, हे आक्षेप ग्राह्य धरण्यात आलेले नाहीत.
छुपा सर्वे करण्यात आला आहे, असे सांगण्यात येत असून शेतकर्यांनी अनेक ठिकाणी अडवूनही सर्वे कसा झाला, असा सवाल शेतकर्यांतून उपस्थित होत आहे.
69 किलोमीटर अंतराचा हा रिंगरोड काढण्यात येणार असून त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 21 दिवसांच्या आत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम भागातील 16 गावातून हा रिंग रोड काढण्यात येणार असून त्यानंतर पूर्व भागातील जमीन संपादित करण्यात येणार आहे.
रिंग रोड जमीन संपादनास दुसऱ्यांदा अधिसूचना @NHAI_Official @JarkiholiSatish @nitin_gadkari @CMofKarnataka @DKShivakumar pic.twitter.com/YR7cZGAiW1
— Belgaumlive (@belgaumlive) August 4, 2023
पहिल्या टप्प्यात अगसगे, कडोली, गोजगे, मण्णूर, आंबेवाडी, कल्लेहोळ, उचगाव, तुरमुरी, बाची, बेळगुंदी, बिजगर्णी, नावगे, संतीबस्तवाड, बहाद्दरवाडी, वाघवडे, झाडशहापूर येथील एकूण 2021854 चौरस मीटर जमीन संपादित करण्यात येणार आहे.
रिंगरोडसाठी शेतकर्यांचा विरोध असल्यास त्यांनी 21 दिवसांच्या आत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवबसवनगर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात आक्षेप नोंदवता येणार आहेत.
एकूणच रिंग रोड संदर्भात शासनाने जमिनी संपादनासाठी हरकती दाखल करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील दोन महिन्यात पालकमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची तीन वेळा भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी रिंग रोडचे काम लवकरच सुरू करण्या बाबत वक्तव्य केले होते.