बेळगाव लाईव्ह:लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेळगाव दक्षिण येथील सब रजिस्टर अर्थात उपनोंदणी कार्यालयाला अचानक भेट देऊन चौकशी सुरू केल्यामुळे कार्यालयातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली. सदर कार्यालयाच्या बाबतीत या आधीच अनेक तक्रारी असल्यामुळे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चौकशी व कागदपत्र तपासणी सुरू करताच सर्वांची तारांबळ उडाली होती.
बेळगाव दक्षिण मतदार संघात नोंदणी मुद्रांक विभाग, उपनोंदणी व विवाह नोंदणी अधिकारी कार्यालय आहे. सदर उपनोंदणी कार्यालयाच्या बाबतीत अनेक तक्रारी असतात. या वाढत्या तक्रारींची दखल घेत बेळगाव लोकायुक्त अधिकारी निरंजन पाटील, लोकायुक्त एसपी हनुमंत राय आदींनी आज बुधवारी सकाळी सदर कार्यालयाला अचानक भेट दिली.
तसेच त्यांनी उप नोंदणी अधिकाऱ्यांना आपण या कार्यालयातील काम कसे चालले आहे हे पाहण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी येथे आलो आहोत असे सांगितले. मात्र या बरोबरच त्यांनी कार्यालयातील कामकाजाची चौकशी सुरू करून कागदपत्रांबाबत विचारणा करताच उप नोंदणी अधिकारी व तेथील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना आणि त्यांनी विचारलेल्या कागदपत्रांची पूर्तता करताना कार्यालयातील सर्वांचीच तारांबळ उडाली होती.
आपल्या भेटीप्रसंगी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेनामी मालमत्ता खरेदी, जनतेच्या तक्रारी आदींसंदर्भात उप नोंदणी अधिकाऱ्यांना जाब विचारून धारेवर धरले. तसेच जागेच्या मूळ मालकाची खरी माहिती मिळवूनच खरेदी नोंद करावी. जनतेच्या तक्रारींचे तात्काळ निवारण केले जावे वगैरे आवश्यक सूचना यावेळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी उपनोंदणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या.
बेळगाव लोकायुक्त एसपी हनुमंत राय,अधिकारी पोलिस निरीक्षक निरंजन पाटील, निरीक्षक आवटी आदींनी एखादा छापा टाकल्याप्रमाणे बेळगाव दक्षिण उप नोंदणी कार्यालयाला दिलेली भेट परिसरात चर्चेचा विषय झाली होती तसेच लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सदर उप नोंदणी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरून चांगली समज दिल्यामुळे जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
लोकायुक्तांच्या रडारवर बेळगाव दक्षिण सब रजिस्ट्रार कार्यालय | Belgaum Live – बेळगाव लाईव्ह|
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दक्षिण सब रजिस्ट्रार अर्थात उपनोंदणी कार्यालयावर भेट बेकायदेशीर कामे होत असल्याच्या तक्रारी वरून विविध कागदपत्रे तपासून चौकशी केली.
सविस्तर वृत्त लवकरच…. pic.twitter.com/OzyWb1WXIF— Belgaumlive (@belgaumlive) August 30, 2023