बेळगाव लाईव्ह : राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना येत्या 17 नोव्हेंबरपर्यंत हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (एचएसआरपी) असणे आवश्यक आहे, अशी घोषणा कर्नाटक राज्य परिवहन खात्याने केली आहे. सदर निर्णयाची अधिकृत सूचना गेल्या 17 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली असून 17 नोव्हेंबरपर्यंत या सूचनेची अंमलबजावणी न करणाऱ्या वाहन मालकांना 500 ते 1000 रुपयेपर्यंत दंड आकारला जाणार आहे.
एचएसआरपी नसल्यास आरटीओमध्ये कारशी संबंधित कोणतेही काम तुम्ही करू शकणार नाही. म्हणूनच, शक्य तितक्या लवकर ऑनलाइन अर्ज करून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावून घ्यावी लागणार आहे. तुमच्या गाडीवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावलेली नसेल तर तुमच्या गाडीचं फिटनेस प्रमाणपत्र जारी केलं जाणार नाही. वाहन हस्तांतरण आणि चालानसंबंधित कोणतीही कार्यवाही होणार नाही. तसेच विमादेखील काढता येणार नाही.
काय आहे एचएसआरपी : एचएसआरपी एक होलोग्राम स्टीकर असतं, ज्यावर वाहनाच्या इंजिनाचा नंबर आणि चेसिस नंबर असतात. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) वाहनाची सुरक्षा आणि सुविधांना नजरेसमोर ठेवून बनवली आहे. हा नंबर प्रेशर मशीनद्वारे लिहिलेला असतो. या प्लेटवर एक प्रकारचा पिन नंबर असतो, जो तुमच्या वाहनाशी जोडलेला असतो. हा पिन एकदा वाहन प्लेटशी जोडला गेल्यानंतर दोन्ही बाजूने लॉक होईल. त्यानंतर कोणीही हे लॉक ओपन करु शकणार नाही.
दरम्यान राज्यातील सर्व वाहनांच्या नोंदणी प्लेट्स प्रमाणित करण्याच्या उद्देशाने एचएसआरपीची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती कर्नाटक परिवहन खात्याच्या सूत्रांनी दिली आहे. परिवहन खात्याच्या माहितीनुसार गेल्या एक एप्रिल 2019 पूर्वी जवळपास 1.75 कोटी ते 2 कोटी इतक्या प्रचंड संख्येने राज्यामध्ये वाहनांची नोंदणी झाली आहे. त्या तारखेपासून नव्याने तयार करण्यात आलेल्या सर्व वाहनांवर एचएसआरपी बसवणे अनिवार्य असणार आहे. त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त एचएसआरपी उत्पादक जुन्या वाहनांना त्या प्लेट्सचा पुरवठा करण्यास बांधील असतील.
आधीच अस्तित्वात असलेल्या वाहनांचे मालक वाहन उत्पादक कंपनीच्या अधिकृत वितरकाच्या माध्यमातून आपल्या वाहनावर एचएसआरपी बसवून घेऊ शकतात. चार चाकी वाहनांना एचएसआरपी बसून घेण्यासाठी 400 ते 500 रुपये, तर दुचाकी वाहनांसाठी 250 ते 300 रुपये खर्च येऊ शकतो. देशातील 12 राज्यांमध्ये या पद्धतीने नंबर प्लेट्स नियमन प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. एचएसआरपी अंमलबजावणीचा मुख्य उद्देश वाहनांशी संबंधित गुन्हेगारीला आळा घालणे आणि रस्ते सुरक्षितता वाढविणे हा आहे.