Saturday, July 13, 2024

/

ओमान मधील 100 प्रभावी सीईओंमध्ये बेळगावचे पटेल

 belgaum

बेळगाव लाईव्ह:अल ओमानिया फायनान्शिअल सर्विसेसचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी अफताब पटेल यांनी ओमान मधील आघाडीच्या 100 सर्वात प्रभावशाली सीईओंच्या यादीत स्थान पटकाविले आहे. मूळचे बेळगावचे असलेल्या पटेल यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर हे यश मिळविले आहे.

बेळगाव मध्ये जन्मून येथेच लहानाचे मोठे झालेल्या अफताब पटेल यांचे शालेय शिक्षण 1972 मध्ये सेंट पॉल्स हायस्कूल येथे झाले. त्यानंतर 1977 मध्ये त्यांनी गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स मधून वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली. त्याचप्रमाणे पुढे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाची पदवी देखील मिळविली.

अफताब पटेल यांच्या यशाचा प्रवास त्यांच्या अपवादात्मक नेतृत्व आणि वित्त क्षेत्रातील नैपुण्याद्वारे चिन्हांकित केले गेला आहे. अल ओमानिया फायनान्शियल सर्व्हिसेसचा सीईओ या नात्याने कंपनी वृद्धिंगत करण्यात आणि तिच्यात नवीनता आणण्याची क्षमता आपल्यात असल्याचे त्यांनी सातत्याने दाखवून दिले आहे. अफताब पटेल हे सल्तनत मधील प्रीमियर नॉन बँकिंग आर्थिक संस्था असलेल्या अल ओमानिया फायनान्शियल सर्व्हिसेसचे संस्थापक सदस्य, प्रवर्तक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 1997 मध्ये नम्र सुरुवात करून विकसित झालेली ही कंपनी आज ओमान मधील वित्तीय क्षेत्रात अग्रणी आहे.

वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेले अफताब पटेल हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुंबई येथील एएफ फर्ग्युसन अँड कंपनीमधून केली आणि त्यानंतर या कंपनीशी संबंधित सिमेंट कंपनीमध्ये ते कार्यरत झाले. पुढे 1984 मध्ये मस्कतला जाऊन ते 1990 मध्ये ओमर झावावी एस्टॅब्लिशमेंट (ओएमझेडईएसटी) सोबत काम करू लागले.Aftab patel

त्यांची मस्कत बँकेच्या प्रॉफिट सेंटर हेड या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट बँकर्सचा एक समूह आणि निवृत्ती निधीच्या मदतीने त्यांनी 1997 मध्ये अल ओमानियाची स्थापना केली. इन्सिड बिझनेस स्कूल अँड डिलाईटच्या 2016 या वर्षाच्या मानांकनांमधील आघाडीच्या 50 सर्वोत्तम सीईओंमध्ये पटेल यांना स्थान देण्यात आले होते. यासाठी 2016 मध्ये झालेल्या जीसीसी बँकिंग शिखर परिषदेप्रसंगी त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यांच्या समर्थ नेतृत्व आणि दूरदृष्टीमुळे अल ओमानियाची इतकी भरभराट झाली की अर्न्स्ट अँड यंग या संस्थेने सदर कंपनीला 2006, 2008, 2010, 2011 व 2012 मध्ये सर्वोत्तम नॉन बँकिंग वित्त संस्थेसाठी असलेले प्रथम क्रमांकाचे मानांकन दिले होते. ओईआर आणि जीबीसीएम या संस्थांनी देखील अल ओमानिया कंपनीला प्रथम मानांकनाचा पुरस्कार आहे. सदर पुरस्कार जेंव्हा 2012 मध्ये सुरू झाला, त्यावेळी आफताब पटेल हे धोफार कॅटल फीड एसएओजी कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य तसेच लेखा समितीचे अध्यक्ष होते. ओमान -भारत मैत्री संघाची 2020 मध्ये सुरुवात झाल्यापासून ते या संघाच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत.

याखेरीज ते इंडो -गल्फ चेंबर ऑफ कॉमर्स ओमान शाखेच्या संचालक मंडळाचे नामनिर्देशित सदस्य आहेत. ओमान मधील अत्यंत प्रभावशाली सीईओंपैकी एक असलेल्या अफताब पटेल यांचे कर्तुत्व होतकरू नेते आणि उद्योजकांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी आहे. बेळगावपासूनचा अल ओमानिया फायनान्शियल सर्व्हिसेस पर्यंतचा त्यांचा उल्लेखनीय प्रवास हा ठाम निर्धार, कठीण परिश्रम आणि उत्कृष्टतेसाठी अथक प्रयत्न याची ताकद काय असते ते दाखवून देतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.