राष्ट्रीय खेळ दिनाच्या निमित्ताने केलेल्या विशेष वृत्तात बेळगाव लाईव्ह ने शहरात आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू तयार झाले मात्र सध्या हॉकी मैदानाची वानवा असल्याची खंत व्यक्त केली होती त्याचीच दखल घेत बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेने हॉकी मैदानासाठी प्रयत्न करत आहेत. मंत्री संतोष लाड यांची भेट घेऊन त्यांनी हे प्रयत्न केले आहेत.
बेळगाव आणि धारवाड शहरांमध्ये आधुनिक एस्ट्रो टर्फ हॉकी मैदानाची निर्मिती करण्यासंदर्भात बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच कामगार आणि धारवाड जिल्हा पालक मंत्री संतोष लाड यांची भेट घेऊन चर्चा केली.
महान हॉकीपटू पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या स्मृती प्रित्यर्थ मंगळवारी 29 ऑगस्ट रोजी देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. धारवाड येथे आयोजित या राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमास जिल्हा पालकमंत्री संतोष लाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री लाड यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत बेळगाव व धारवाड येथील नियोजित एस्ट्रो टर्फ हॉकी मैदानाबाबत चर्चा केली.
तसेच सदर मैदानासंदर्भात मंत्र्यांना निवेदनही सादर केले. जिल्हा हॉकी संघटना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळात घुळाप्पा होसमनी, विकास कलघटगी, सुधाकर चाळके, उत्तम शिंदे, गणपत गावडे आदींचा समावेश होता.
पूर्वीच्या हॉकीपटुंनी कोरले नांव, सध्या मात्र मैदानाचा अभाव