बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र राज्य फलक हटविल्यानंतर पोलिसांनी येळळूर ग्रामस्थांवर अमानवी अत्याचार केले. घरात घुसून अबाल वृद्धांना प्रचंड मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांवरच दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीत बुधवारी तपास अधिकाऱ्याचा जबाब नोंदविण्यात आला. पुढील सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होणार आहे.
27 जुलै 2014 मध्ये पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात येळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक हटविण्यात आला. त्याला शांततेत विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर पोलिसांनी अमानवी अत्याचार केले. उलट 67 ग्रामस्थांवर खटला नोंदविला. या खटल्यातील तपास अधिकाऱ्याची तब्बल सात वर्षानंतर साक्ष नोंदविण्यात आली आहे.
तपास अधिकारी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल ब्याकुड यांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यातील दोन फिर्यादी सुनावणीला अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्या विरोधात वॉरंट बजावण्यात आला आहे.
22 ऑगस्ट रोजी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.येळळूर ग्रामस्थांच्या वतीने ॲड शामसुंदर पत्तार, ॲड शाम पाटील आणि ॲड हेमराज बेंचन्नावर हे काम पाहत आहेत.
येळ्ळूर येथील “महाराष्ट्र राज्य येळ्ळूर” हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या जनतेला अमानुष मारहाण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले.
याप्रकरणी दोन खटले दाखल करण्यात आले आहेत. या खटल्यांची सुनावणी 2014 पासून सुरू आहे. सीसी क्र. 794 या खटल्यामध्ये कुमार मासेकर, मनोज नायकोजी, केदारी पाटील, नंदू कुगजी, राहुल अष्टेकर, नामदेव कदम, राजू नायकोजी, सुधीर धामणेकर, जयसिंग अष्टेकर व प्रकाश कुगजी या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसेच सीसी क्र. 167 मध्ये शांताराम कुगजी, सतीश कुगजी, राजू धामणेकर, अशोक धामणेकर, विनोद जाधव, रामा कुगजी, चंद्रकांत हंपन्नावर, शिवाप्पा हंपन्नावर, राहुल कुगजी, हेमंत नायकोजी, निलेश कुंडेकर, प्रकाश पाटील, उदय जाधव, संगप्पा कुगजी, श्रीधर जाधव, दिनेश घाडी, लक्ष्मण कुगजी, योगेश मजुकर, उमेश जाधव, मंजुनाथ हिरेमठ, महेश कुगजी, नागराज कुगजी, प्रशांत टक्केकर, सुरेश कुगजी, रामा पाटील व बबलू अष्टेकर या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.