Monday, May 13, 2024

/

गृहलक्ष्मी” शुभारंभ पुन्हा लांबणीवर; 27 ऑगस्ट नवी तारीख

 belgaum

राज्य सरकारच्या पाच गॅरंटी योजनांपैकी एक असलेल्या बहुप्रतिक्षित “गृहलक्ष्मी” योजनेचा 20 ऑगस्ट रोजी होणारा शुभारंभ पुन्हा लांबणीवर पडला आहे. बेळगाव येथून 20 ऐवजी येत्या 27 ऑगस्ट रोजी गृहलक्ष्मी योजनेचा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

सुवर्ण विधानसौध येथे काल गुरुवारी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केल्यानंतर मंत्री हेब्बाळकर बोलत होत्या. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेचा बेळगावमध्ये शुभारंभ होणार आहे. राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या 20 ऑगस्ट रोजी ही योजना सुरू होणार होती. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे उभयता उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र आता गृहलक्ष्मीचा शुभारंभ 27 ऑगस्टपर्यंत पुन्हा लांबणीवर पडला आहे.

गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या प्रत्येक कुटुंबातील मुख्य गृहिणीला दरमहा 2000 रुपयांचे गौरवधन दिले जाणार आहे. यापूर्वी 17 ऑगस्ट रोजी सदर योजना लागू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता या योजनेला दहा दिवस विलंब होत आहे.

 belgaum

गृहलक्ष्मी योजनेच्या उद्घाटन समारंभास सोनिया गांधी राहुल गांधी प्रियांका गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रित करण्यात येईल. राज्यात 11000 ठिकाणी एकाच वेळी या योजनेची सुरुवात करण्यात येईल. ग्रामपंचायत, नगरसभा, नगरपंचायतीमध्ये योजनेचा उद्घाटन समारंभ होणार आहे. या योजनेसाठी प्रत्येक पंचायतीला नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती देऊन सर्वांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम निपक्षपाती यशस्वी करावा, असे आवाहन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले आहे.

प्रत्येक खेडे, तालुका, जिल्हा पंचायत, महानगरपालिकेच्या प्रभात पातळीवर गृहलक्ष्मीच्या लाभार्थीना एकत्र आणून आनंद उत्सव साजरा करण्यास सांगितले आहे. राज्यातील 1 कोटी 28 लाख महिलांना या योजनेत समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यावेळी दिली.

बेळगाव मध्ये गृहलक्ष्मी योजनेचे लोकार्पण होणार असून पंचायत पातळीवरही कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. बेंगलोरमध्ये 198 ते 200 ठिकाणी गृहलक्ष्मी लोकार्पण कार्यक्रम आयोजित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.