बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील साई कॉलनी येथे एका सरकारी प्रकल्पाच्या खोदकामामुळे निर्माण झालेला पावसाच्या पाण्याचा मोठा डोह लहान शाळकरी मुलांसाठी धोकादायक ठरत असून याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.
साई कॉलनी येथील महानगरपालिकेच्या खुल्या जागेमध्ये अटल बिहारी वाजपेयी आवास योजना राबविण्यात येणार असल्याचे समजते. त्याच्या बांधकामाचा पाया घालण्यासाठी गेल्या कांही महिन्यांपूर्वी संबंधित जागेत खोदकाम हाती घेण्यात आले होते.
मात्र सदर प्रकल्पाचे काम अलीकडे अर्ध्यावरच थांबवण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या पावसाळ्यात प्रकल्प बांधकामाच्या पायासाठी खोदण्यात आलेल्या मोठ्या खोल खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी तुडुंब भरून त्याला धोकादायक डोहाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सध्या सदर डोह साईनगर परिसरातील लहान शाळकरी मुलांना आकर्षित करत असून ही मुले त्या डोहामध्ये पोहताना दिसत आहेत. अजान शाळकरी मुले अतिउत्साही असतात. त्यामुळे या ठिकाणी एखादी दुर्घटना घटना घडून मुलांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी या भागाच्या लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी साईनगर येथील जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.