बेळगाव लाईव्ह :जुना पीबी रोड, बेळगाव येथील जीर्णोद्धारित श्री रेणुकादेवी मंदिराचा 5 वा वर्धापन दिन आज सोमवारी भक्तीभावाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील जुना पुना -बेंगलोर रोड या रस्त्यावर पाच वर्षापूर्वी पिंपळाच्या झाडाखाली पूर्वापार असलेल्या श्री रेणुका देवीच्या लहान स्वरूपातील मंदिराचा 5 वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करून मोठे मंदिर उभारण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षापासून जीर्णोद्धाराचे काम सुरू असून सदर मंदिराचा सर्वांगीण विकास साधण्यात येत आहे.
गोव्यातील मंदिरांच्या शैलीत या श्री रेणुका देवी मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिराच्या विकासासाठी भाविकांकडून सढळ हस्ते उस्फूर्त मदत केली जात आहे. आजच्या पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त दिवसभरात शेकडो भाविकांनी या मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
यानिमित्त श्री रेणुका देवी मंदिराच्या विश्वस्त समितीच्या सदस्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना देवीचे पूर्वीचे मंदिर आणि आता जीर्णोद्धार करून या मंदिराचा केला जाणारा विकास याबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे श्री रेणुका मंदिरामध्ये उद्या पहिल्या श्रावणी मंगळवार निमित्त सकाळी 9 वाजता होमहवन होणार होणार आहे. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता महाआरती होऊन तीर्थप्रसादाचे वाटप केले जाईल. भाविकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही विश्वस्त समितीने केले आहे.
हिंदू परंपरेनुसार श्रावण महिन्यात सर्व मंदिरांचे दरवाजे खुले ठेवले जातात. त्या अनुषंगाने जुन्या पीबी रोड येथील श्री रेणुका मंदिर देखील भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षापासून सदर मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या आणि मंदिराचा महिमा दिवसेंदिवस वाढत आहे.