आगामी सार्वजनिक श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विविध समस्यांचे निवारण केले जावे, अशी मागणी शहरातील श्री लोकमान्य टिळक गणेश महामंडळाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांसह बेळगाव महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
श्री लोकमान्य टिळक गणेश महामंडळ महानगर बेळगावचे अध्यक्ष विजय जाधव आणि सेक्रेटरी हेमंत हावळ यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील आणि महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना सादर करण्यात आले. उभय अधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे.
बेळगावच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाला एक शतकापेक्षा अधिक वर्षांची जुनी परंपरा असून हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने उत्साहात साजरा केला जातो. सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेला बेळगावचा गणेशोत्सव मुंबई पुण्याप्रमाणेच प्रसिद्ध आहे. तेंव्हा या उत्सवाच्या पूर्वतयारी करता खालील बाबींचा विचार करून त्याची अंमलबजावणी व्हावी.
श्री गणेशोत्सवापूर्वी खराब रस्त्यांची व डांबरीकरण केले जावे, मिरवणूक मार्गावरील जीर्ण झालेले वृक्ष हटवावेत, वीज वाहिन्यांची दुरुस्ती करून आवश्यक ठिकाणी पथदिपांची उभारणी करावी, जुन्या कपलेश्वर विसर्जन तलावासह नवीन विसर्जन तलाव जक्केरी होंडा व महापालिकेच्या व्याप्तीतील सर्व विसर्जन तलावांची डागडुजी व स्वच्छता करण्यात यावी. शहराच्या विविध भागात श्री विसर्जनासाठी तात्पुरत्या जलकुंडांची निर्मिती केली जावी. खेड्यापाड्यातून येणाऱ्या भक्तांसाठी विशेष बस सेवा पुरवावी.
श्री गणेशोत्सव काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, कापड दुकाने, इलेक्ट्रॉनिक सामग्री व उत्सवासाठी लागणाऱ्या सजावटी सामग्रीची दुकाने तसेच हॉटेल व्यवसायिकांना वेळेचे बंधन शिथिल करून द्यावे. जेणेकरून सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही. विसर्जन मिरवणुकीमध्ये विशेष महिला पोलीस बंदोबस्त ठेवून गर्दीच्या ठिकाणी महिला व बालकांना सहकार्य करावे.
महिलांसाठी तात्पुरत्या त्यावेळी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जावी. दरवर्षी प्रशासन कार्यतत्वतेने या सर्व कामांची पूर्तता करत असते. यंदाही गणेशभक्तांना आपल्या बहुमूल्य सहकार्याची अपेक्षा आहे. आपल्या सहकार्याने बेळगावचा गणेशोत्सव यंदाही भव्य प्रमाणात साजरा केला जावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, हेमंत हावळ, सुनील जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.