मागील कोरोना प्रादुर्भाव काळात सरकारच्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याबद्दल माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह इतर 12 जणांवर दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात पुढील लढा देण्यासाठी उच्च न्यायालयात खटला दाखल केला जाईल, असे न्यायालयीन कामकाज वकील ॲड. धनकुमार पाटील यांनी सांगितले.
मागील जानेवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले होते. त्यावेळी म्हणजे 16 जानेवारी 2022 रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला होता.
त्याबद्दल कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत माजी आमदार अनिल बेनके, ध. छत्रपती संभाजीराजे चौक सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव व नगरसेवक जयतीर्थ सौन्दती यांच्यासह इतर दहा कार्यकर्त्यांच्यावर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त पूजन केल्याबद्दल कर्नाटक साथीचे रोग कायदा 2020 अंतर्गत सीआर नं. 05/ 2022/यू/कलम 4, 5 (1 ) 5,(3) 5(4) अन्वये त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
याप्रकरणी आता पुढील लढ्यासाठी उच्च न्यायालयात खटला दाखल केला जाईल, असे न्यायालयाचे कामकाज वकील ॲड. धनकुमार पाटील यांनी सांगितले आहे.