Sunday, May 12, 2024

/

मराठी नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा : सभागृहात छेडले ठिय्या आंदोलन

 belgaum

बेळगाव लाईव्ह:नगरसेवकांच्या घरांवर नोटीस चिकटवल्याच्या कृतीची पडसाद आज महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत उमटली. सदर कृतीच्या विरोधात जोरदार आवाज उठवत मराठी नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन छेडून तीव्र निषेध नोंदविला. तसेच घरावर नोटीस चिकटवण्यास सांगणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा आज 16 ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित झाल्यानंतर बैठकीची नोटीस केवळ कन्नड व इंग्रजी अशा दोनच भाषा तयार करण्यात आली होती. या पद्धतीने मराठी भाषेला डावलल्यामुळे नोटीस नाकारण्याचा निर्णय मराठी नगरसेवकांनी घेतला. त्यामुळे नोटीस देण्यास आलेले महापालिकेचे कर्मचारी माघारी निघून गेले होते. तथापि ती नोटीस नगरसेवकांच्या घरावर चिकटवण्याची सूचना गेल्या शनिवारी संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानुसार समिती नगरसेवकांनी तसेच विरोधी गटाच्या इतर काही नगरसेवकांच्या घरांवर नोटीस चिकटवण्यात आली होती. या हुकूमशाही कृतीची पडसाद आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत उमटली.

बेळगाव महापालिकेची सर्वसाधारण बैठक आज मंगळवारी महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीत समिती नगरसेवकांनी घरावर नोटीस चिकटवण्याच्या कृतीचा मुद्दा उपस्थित केला. मराठी नगरसेवकांना मराठीतून नोटीस देण्याची व्यवस्था केली जाईल असे महापौरांनी सांगितले असताना पुन्हा कन्नड मधूनच नोटीस बजावण्यात आली आहे हा खरंतर महापौरांचा अपमान आहे. आम्ही नोटीस घेतली नाही म्हणून आमच्या घरावर नोटीस चिकटवण्यात आली. आम्ही बँकेचे डिफॉल्टर आहोत की काय? नगरसेवकांनी नोटीस स्वीकारली नाही म्हणून ती घराच्या भिंतीवर चिकटून जाणे हे कायद्याला धरून आहे का? असा सवाल करून नोटीस लावण्यास सांगणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई अशी मागणी मराठी नगरसेवकांनी  केली. त्यानंतर महापालिकेच्या नोटिसा -परिपत्रकांमध्ये मराठीचाही अंतर्भाव केला जावा. तसेच घरावर नोटीस चिकटवण्यास सांगणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी तीन समिती नगरसेवकांनी या मराठी नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत आपले आसन सोडून सभागृहामध्ये महापौरांसमोर ठिय्या आंदोलन छेडले.

 belgaum

समिती. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू शेठ यांनी देखील नगरसेवकांच्या घरावर नोटीस चिकटवण्याच्या कृतीचा तीव्र निषेध केला. त्याचप्रमाणे बेळगाव दक्षिणच्या आमदारांनी कायद्यानुसार महापालिकेच्या नोटीस किती भाषांमध्ये देता येऊ शकतात? अशी विचारणा केली. त्यावेळी कौन्सिल सेक्रेटरींनी नियमानुसार प्रामुख्याने कन्नडचा आणि जास्तीत जास्त इंग्रजीचा वापर करता येऊ शकतो. त्या व्यतिरिक्त इतर भाषेत नोटीस देता येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसे असेल तर मग गेल्या पाच वर्षांपूर्वी किंवा त्यापूर्वी किती भाषांमध्ये नोटीस दिली जात होती? याची प्रथम शहानिशा करा. तसेच मनमानी न करता नगरसेवकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कायद्यानुसार त्यांना न्याय द्या, असे दक्षिण आमदारांनी बजावले.Marathi corporator

नगरसेवकांच्या घरांवर नोटीस ठेवण्याच्या कृतीसंदर्भात बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ म्हणाले की, आमचे थोडे नगरसेवक गावात नव्हते ते परगावी गेले होते. त्यांच्या घरावरही नोटीसा चिकटवण्यात आल्या आहेत. ते नगरसेवक काय गुन्हेगार आहेत का? नोटीशीमधील सूचना फोनवर देखील देता आली असती. कौन्सिल सेक्रेटरी संबंधित नगरसेवकांना नंतर नोटीस देऊ शकले असते. मात्र यापैकी काहींही न करता एखाद्या गुन्हेगाराला नोटीस बजावल्याप्रमाणे नगरसेवकांच्या घराच्या दारावर, भिंतीवर नोटीस चिकटवणे ही अत्यंत निषेधार्ह कृती आहे. या संदर्भात आम्ही महापौरांना विनंती केली असून जे झाले आहे त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. तसेच अशी चूक यापुढे पुन्हा होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगितले आहे.

नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी बेळगाव live शी बोलताना म्हणाले की, मागील वेळी आम्हाला कन्नडमध्ये नोटीस आली होती. मात्र ती आम्ही माघारी पाठवली होती. त्यानंतर आमच्या घरांवर नोटीस चिकटवण्यात आली. आता त्यासंदर्भात कायद्यानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र मला आवर्जून नमूद करावसं वाटतं की तुम्हाला मराठी भाषेबद्दल इतकी कावीळ का आहे? तुम्हाला मराठ्यांची मतं पाहिजेत, जोगवा मागितल्या प्रमाणे मराठ्यांची मतं घेता. मराठ्यांची मतं घेऊनही तुम्हाला मराठी भाषेबद्दल इतका द्वेष का? तुम्हाला मराठ्यांचे मतदान पाहिजे मग त्यांची भाषा का नको? हेच आम्ही आता आम्ही महापौरांना विचारणार आहोत. तसेच आम्हा मराठी नगरसेवकांच्या घरावर ज्या नोटीसा चिकटवल्या आहेत. त्या संदर्भात आम्ही न्यायालयातही दाद मागणार आहोत. कारण आम्ही कोणी गुन्हेगार नाही, नगरसेवक आहोत. आमच्या बाबतीत अशी कृती करणं अत्यंत चुकीची आहे. आम्ही आज धरणे आंदोलन केल्याबद्दल आमच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितण्यात आले आहे. मात्र आम्ही त्या कारवाईला घाबरत नाही असे मराठी नगरसेवकांनी म्हटले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.