कल्याणनगर, वडगाव येथील पावसामुळे पडझड झालेल्या घरांना आज सकाळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधित कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
सध्या पडणाऱ्या पावसामुळे कल्याणनगर, वडगाव येथील प्रेमा परशराम ढगेन्नावर, प्रसाद बसवराज मळी आणि रेणुका पांडुरंग सोट्टक्की यांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे मोठे आर्थिक होण्याबरोबरच तीनही कुटुंबांचे हाल होत आहेत.
याबाबतची माहिती मिळताच श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी आज बुधवारी सकाळी कल्याणनगरला भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबीयांची विचारपूस केल्यानंतर पडझड झालेल्या घरांची पाहणी केली.
तसेच सदर घटनेची सरकार दरबारी नोंद झाली आहे की नाही? वगैरे चौकशी करून घर कोसळलेल्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यासाठी त्यांनी जागेवरूनच तहसीलदार आणि तलाठ्यांशी संपर्क साधून पडझड झालेल्या घरांसंदर्भात माहिती घेतली. तसेच संबंधित तीनही घर मालकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी असे त्यांना सांगितले.
याप्रसंगी कोंडुसकर यांच्या समवेत समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील, महेश वेर्णेकर, आनंद पाटील, राजू बैलूर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.