सालाबाद प्रमाणे वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवी यात्रेला आज मंगळवारपासून अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला असून हजारो भाविकांच्या गर्दीमुळे देवीचा मंदिर परिसर गजबजून गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यात्रेनिमित्त आज सकाळपासून देवदर्शनासह नवस फेडण्यासाठी श्री मंगाई मंदिराच्या ठिकाणी भाविकांची रीघ लागली आहे.
वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवी यात्रा आजपासून अपूर्व उत्साहात साजरी करण्यात येत असून यात्रेनिमित्त देवीच्या मंदिराची रंगरंगोटी करून आकर्षक सजावट करण्याबरोबरच लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्रावण महिन्याला प्रारंभ होण्यापूर्वी होणाऱ्या या यात्रेस बेळगाव शहर परिसर आणि जिल्हासह महाराष्ट्र, गोवा वगैरे परराज्यातील भाविक हजारोच्या संख्येने येत असतात. श्री मंगाई देवी यात्रेच्या आजच्या पहिल्या दिवशी सकाळपासून देवीच्या मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.
आज दुपारी गाऱ्हाणे उतरवण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर खऱ्या अर्थाने पूर्ण भरात यात्रेला प्रारंभ झाला. भाविकांना देवदर्शन सुलभ व्हावे यासाठी यात्रा व्यवस्थापन कमिटीने मंदिराच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून आवश्यक व्यवस्था केल्याचे पहावयास मिळत होते. दरवर्षीप्रमाणे सदर यात्रेनिमित्त मंदिर परिसरातील रस्त्यांवर देवीच्या ओटीचे साहित्य आणि पूजा विधीच्या साहित्याचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. याखेरीज लहान मुलांची खेळणी वगैरे साहित्यांचे स्टॉल देखील पाटील गल्ली, बाजार गल्ली, विष्णू गल्ली आदी रस्त्यांवर पहावयास मिळत आहेत. यात्रेनिमित्त वडगाव येथील सर्व रस्ते सध्या भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.
श्री मंगाई देवी मंदिराच्या ठिकाणी आज मंगळवारी सकाळपासून पूजाविधी कार्यक्रमासह नवस फेडण्यासाठी प्रथेनुसार दीड नमस्कार घालणे, ओलेत्याने नमस्कार घालणे, मंदिरावर कोंबडीची पिले उडवणे हे कार्यक्रम भक्तीभावाने सुरू होते. त्याचप्रमाणे दुसरीकडे फुलांची आकर्षक सजावट केलेल्या श्री मंगाई देवी मंदिरासमोर स्वतःची सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरता येत नसल्याचे पहावयास मिळत होते. त्याचप्रमाणे कांही हौशी भाविक नवस फेडण्यासाठी असलेली कोंबडीची चिमुकली पिले हातात घेऊन फोटो आणि सेल्फी काढताना दिसत होते.
एकंदर यात्रेनिमित्त मंदिर परिसरात अत्यंत उत्साही व आनंदी वातावरण अनुभवावयास मिळत होते.श्री मंगाई यात्रेनिमित्त यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचे फलक आणि बॅनर यात्रा परिसरात झळकताना दिसत आहेत. यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून ठीकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दरवर्षी श्री मंगाई देवी यात्रेच्या पहिल्या दिवशी पावसाची मुसळधार हजेरी असते यंदाची ती नसली तरी आज दिवसभर पावसाळी वातावरण होते. दरवर्षी या यात्रा काळात खरेदी-विक्रीद्वारे लाखो रुपयांची उलाढाल होते. त्या अनुषंगाने यंदा देखील मनोरंजनाच्या साधनासह इतर व्यापारी वडगाव येथे दाखल झाले आहेत. श्री मंगाई यात्रेनिमित्त बकरी व कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्यामुळे वडगाव परिसरात कोंबडी व बकरी विक्रेतेही दाखल झाले आहेत.
अत्यंत जुनी परंपरा असलेल्या श्री मंगाई देवी यात्रेसंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना साहित्यिक गुणवंत पाटील म्हणाले की, वडगावची ग्रामदैवता श्री मंगाई देवीची यात्रा ही बेळगाव शहर परिसरातील प्रमुख यात्रांपैकी एक आहे. यंदा सदर यात्रेनिमित्त अतिशय वेगळ्या पद्धतीने देवीच्या मंदिराची सजावट व आरास करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले आहेत. शहराचा वडगाव हा भाग मूळचा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो ग्रामीण भागात यात्रा हा असा महत्त्वाचा सोहळा असतो या निमित्ताने लोक एकत्र येऊन एकमेकांना भेटतात. यामुळे आचार विचारांची देवाणघेवाण होऊन संघटनात्मक कृती आणि बंधुभाव वाढतो. सदर यात्रेच्या निमित्ताने देखील नेमके तेच साधले जाते. याखेरीज या यात्रेच्या निमित्ताने नवविवाहिता माहेरवाशीन होतात. महत्त्वाचे म्हणजे सदर यात्रेच्या निमित्ताने श्रमपरिहार आणि विशेष खरेदीचा माहोल तयार होत असतो. वडगावच्या श्री मंगाई देवी यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेदरम्यान कोणताही दंगाधोपा अथवा अन्य अनुचित प्रकार घडत नाही.
तथापि यात्रेला 5 -6 लाख भाविक जमत असल्यामुळे खबरदारी म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जातो असे सांगून गुणवंत पाटील यांनी यात्रेनिमित्त पाळल्या जाणाऱ्या वारांबद्दल माहिती दिली. तसेच प्रशासनासह यात्रेची मानकरी घराणी सदर यात्रा यशस्वी करण्यासाठी झटत असल्याचे सांगितले.