बेळगाव लाईव्ह : पोलिस केवळ खाक्याच दाखविण्यासाठी नसून वेळप्रसंगी कठीण प्रसंगी देवदूत बनून देखील मदतीला येऊ शकतात हे आज बेळगावच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने दाखवून दिले आहे.
नवरा बायकोच्या भांडणात तलावात उडी घेऊन आत्महत्या करायला निघालेल्या एका महिलेला वाचवण्याचे काम बेळगावच्या एका रहदारी पोलीस कॉन्स्टेबलने केले आहे. काशिनाथ गिरगाव असे या रहदारी पोलीस निरीक्षकांचे नाव असून त्यांनी आज केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे कौतुक होत आहे.
या घटनेबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, किल्ला तलावाजवळ शनिवारी एका विवाहित महिलेने भरपावसात तलावात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नवरा बायकोच्या भांडणात सदर महिलेने तलावात उडी घेतल्याचे समजते. शिवलीला पर्वतगौडा असे या महिलेचे नाव असून ती बैलवाड गावची रहिवासी आहे. नवरा – बायकोच्या भांडणांनंतर तिने बेळगाव गाठले आणि रागाच्या भरात तिने किल्ला तलावात उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
भर पावसात घडलेल्या या घटनेत पोलीस निरीक्षक यांनी क्षणाचाही विलंब न करता महिलेचे प्राण वाचविले आणि त्यांच्या या कर्तव्यदक्ष पणाचा व्हिडीओ नेटकऱ्यांनी वायरल केला. किल्ला तलावाजवळ ड्युटीवर असणाऱ्या काशिनाथ इरगार यांनी क्षणार्धात तलावात उडी घेत महिलेचे प्राण वाचविले.
एकीकडे रहदारी नियंत्रणाची जबाबदारी आणि दुसरीकडे महिलेने तलावात उडी घेतल्याने माजलेली एकच खळबळ अशावेळी काशिनाथ इरगार यांनी साहसीपणाने महिलेचे प्राण वाचविले. या घटनेचा व्हिडीओ याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
आणि पाहता पाहता हा व्हिडीओ बेळगावच्या सोशल मीडियावर तुफान वायरल झाला. यामध्ये रहदारी नियंत्रणाच्या ड्युटीवर असलेल्या काशिनाथ गिरगाव यांनी केलेल्या कामगिरीचे मोठे कौतुक होत आहे. या शिवाय पोलीस आयुक्त कार्यालयाकडून देखील पाच हजार रोख रक्कम बक्षीस जाहीर करून अभिनंदन करण्यात आले असून मुख्यमंत्री पदकासाठी त्याची शिफारस देखील करण्यात येणार आहे.