पत्रकार असल्याची बतावणी करून बेळगाव शहर आणि जवळपासच्या गावातील डॉक्टरांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न दोघा व्यक्तींकडून केला जात असून त्यांचा तात्काळ बंदोबस्त करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आयुष फेडरेशन ऑफ इंडियाच्या बेळगाव तालुका शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे.
आयुष फेडरेशन ऑफ इंडिया बेळगाव तालुका शाखेचे अध्यक्ष डॉ पद्मराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही आयुष फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की काही व्यक्ती आपण पत्रकार असून दवाखान्याची पाहणी करण्यास आलो आहोत असे सांगत शहर आणि जवळपासच्या गावात फिरत आहेत विचारणा केली असता खुद्द जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (डीएचओ) आम्हाला सर्वेक्षण आणि पाहणी करण्यासाठी धाडले असल्याची बतावणी ते करत आहेत. त्यांची नावे बिलाल जमादार आणि राजशेखर पाटील अशी आहेत. डॉक्टरांना ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्नात असलेले हे उभयता होंडा जाझ (क्र. के 24 एम 8224) या काळ्या रंगाच्या कारगाडीतून फिरत आहेत. तरी या उभयतांचा छडा लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. सदर निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देखील सादर करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतेवेळी डॉ. सुरेश चौगुले, डॉ. प्रवीण डोण्यांनावर, डॉ. विनोद पट्टण, डॉ. आदीश्वर गाणी, डॉ. आर. एच. घोरपडे, डॉ. अनिल बी. एस., डॉ. गौरव जे., डॉ. शंकर पी., डॉ. सचिन पाटील, डॉ. जे. एम. खोत, डॉ. विनायक घाडी, डॉ. श्रीधर पाटील, डॉ. लक्ष्मण पाटील, डॉ. राजेश पाटील, डॉ विश्वजीत शिंदे आदी डॉक्टर्स उपस्थित होते.
यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना डॉ. पद्मराज पाटील म्हणाले की, गेल्या 15 दिवसापासून बिलाल जमादार आणि राजशेखर पाटील या नावाचे दोघेजण स्वतः पत्रकार असल्याची बतावणी करून शहर परिसरातील डॉक्टरांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेत. काळ्या होंडा जाझ कारमधून दवाखान्यांना भेटी देणारे हे दोघे आम्ही हेल्थ डिपार्टमेंट कडून आलो आहोत. आम्हाला डीएचओनी पाठवले आहे असे सांगून डॉक्टरांना त्रास देऊन लुबाडण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत आम्ही आरोग्य खातं आणि डीएचओ यांच्याकडे चौकशी केली असता आम्ही अशा माणसांना पाठवलेले नाही असे त्यांनी सांगितले आहे पत्रकार असल्याची बतावणी करून संबंधित व्यक्ती हा प्रकार करत असल्यामुळे या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन दिले असून संबंधितांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
त्याचप्रमाणे शहर आणि आसपासच्या गावातील सर्व डॉक्टरांना सावध केले आहे जर पत्रकार असल्याचे सांगून त्रास देत असेल तर आमच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे डाॅ. पाटील यांनी डॉक्टरांना ब्लॅकमेल करू पाहणाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती दिली. स्वतःला पत्रकार म्हणवणारे बिलाल जमादार आणि राजशेखर पाटील डॉक्टरांकडे 40-50 हजाराची मागणी करत आहेत आणि सौदा जमला नाही तर मिळेल तेवढी रक्कम उकळत आहेत. आतापर्यंत कांही डॉक्टरांनी त्यांना प्रत्येकी 15-20 हजार रुपये दिले देखील आहेत, असेही डॉ पद्मराज पाटील यांनी स्पष्ट केले.