बेळगावचे सुप्रसिद्ध चित्रकार सुरेंद्र कृष्णराव पाटणेकर यांच्या दोन पेंटिंग्जना अमृता प्रकाश निर्मित ‘आर्ट स्पेक्टरा’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन ग्रुप आर्ट विक्री -प्रदर्शनात स्थान मिळविण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे.
‘आर्ट स्पेक्टरा’ या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन ग्रुप आर्ट विक्री -प्रदर्शनात भारतासह इजिप्त, तैवान, व्हेनिझुएला, मोरोक्को, सीरिया, इंडोनेशिया, थायलंड आदी जगभरातील विविध देशातील निवडक चित्रकारांच्या चित्रकृती मांडण्यात आल्या आहेत.
आर्ट स्पेक्टरामध्ये सुरेंद्र पाटणेकर यांचे ट्रान्सपरंट वॉटर कलरमध्ये तयार केलेले ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ हे कमरेवर पाण्याची घागर घेतलेल्या पाठमोऱ्या महिलेचे पेंटिंग आणि ‘ओल्ड बिल्डिंग डोअर’ हे जुन्या इमारतीच्या दरवाज्याचे पेंटिंग मांडण्यात आले आहे. या चित्रकृतींची किंमत अनुक्रमे 20,000 रु. आणि 14,500 रु. इतकी दर्शविण्यात आली आहे.
आर्ट स्पेक्टरा आंतरराष्ट्रीय ऑनलाईन ग्रुप आर्ट विक्री -प्रदर्शनाला काल शनिवारी प्रारंभ झाला आहे. भारतातील ज्येष्ठ आणि प्रतिभावंत चित्रकार जीतीन हजारीका यांनी या प्रदर्शनाचे आभासी उद्घाटन केले.
सदर विक्री प्रदर्शन येत्या 23 ऑगस्टपर्यंत खुले असणार आहे. सदर प्रतिष्ठेच्या प्रदर्शनात स्थान मिळाल्याबद्दल सुरेंद्र पाटणेकर यांचे सोशल मीडियासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.