बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात असणाऱ्या तीन प्रमुख नाल्यांपैकी एक असणारा नाला म्हणजे लेंडी नाला. पावसाळ्यात शहरातील पाण्याचा निचरा होण्यामध्ये लेंडी नाला हा महत्त्वाची भूमिका बजावतो.
मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिजपासून या लेंडीनाल्याचा स्रोत सुरु होतो. शहरातील टिळकवाडी, नानावाडी, मराठा सेंटर यासारख्या उंच भागावरील पाणी या नाल्याला येऊन मिळते. धर्मवीर संभाजी चौक, कॅम्प मार्गे कोनवाळ गल्ली, रेल्वे ओव्हर ब्रिज मार्गे शास्त्रीनगर, शिवाजी उद्यान परिसरातून पुढे, ओल्ड पी. बी. रोड मार्गे हा नाला समर्थ नगर, ओमनगर आदी ठिकाणी जातो आणि पुढे हाच नाला बळ्ळारी नाल्याला जाऊन मिळतो.
शहरातील प्रमुख नाल्यांपैकी एक असणाऱ्या या नाल्यामुळे बेळगावकर गेल्या काही वर्षांपासून हैराण आहेत. पावसाळा सुरु झाला कि या नाल्याच्या आसपास परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण होते. नाला फुटणे, नाला ओसंडून वाहून पाणी बाहेर पडणे, पूरपरिस्थिती निर्माण होणे अशा अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते.
गेल्या कित्येक वर्षांपासून या नाल्याची सफाई करण्यासाठी मागण्या करण्यात आल्या. मात्र नेहमीप्रमाणेच प्रशासनाने या गोष्टीलाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
गेल्या ३-४ वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे लेंडी नाला ओव्हरफ्लो झाला. ओव्हरफ्लो झालेल्या पाण्यामुळे नालापरिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा फटका सहन करावा लागला. यानंतर तत्कालीन आमदार अनिल बेनके यांच्या पुढाकारातून नाल्यातील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली. यादरम्यान मोठ्या प्रमाणात नाल्यातून गाळ बाहेर पडला. बेळगाव शहराच्या उपनगरातून वाहणारा हा नाला नेहमीच ओमनगर आणि समर्थ नगर वसाहतींमधील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
या नाल्याच्या स्वच्छतेसाठी आणि इतर समस्येसाठी येथील नागरिकांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे सहकार्याची मागणी केली. हि समस्या सोडविण्यासाठी अनेक निवेदने देण्यात आली. मात्र, याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याने २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीत या नाल्याने आपली करामत दाखवली. पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या नाल्याने कचऱ्यासहित नागरी वसाहतीत प्रवेश केला. नागरिकांच्या घरात पाणी शिरले आणि कित्येकांचे संसार उघड्यावर आले. या घटनेनंतर येथील नागरिकांना पावसाळा सुरु झाला कि आपला जीव मुठीत धरून राहावे लागते.
या नाल्यातून किल्ला खंदकापासून मोठ्या प्रमाणात पाणी पुढे वाहते. तेच पाणी राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्व दिशेला जाते. या नाल्याचे पाणी कुडची परिसरातील शेतकरी शेतीसाठी वापरतात. त्यानंतर ते पाणी बळळारी नाल्याला जाते. त्यामुळे समर्थ नगर कॉलनीला त्याचा पूर येतो. पाण्याचा निचरा योग्य झाला नाही तर नाल्यातील पाणी ओव्हरफ्लो होऊन या भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने याचा फटका शहरातील विविध भागांना बसत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान होत आहे. शहरातील सांडपाणी वाहणाऱ्या सर्वात मोठ्या नाल्याच्या साफसफाईचा प्रश्न नेहमीच चर्चेत येतो.
मात्र पावसाळा संपला कि पुन्हा या समस्येकडे डोळेझाक केली जाते. पावसाळा सुरु झाल्यानंतर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या या नाल्याच्या साफसफाईकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष पुरवावे, वेळीच या नाल्याच्या सफाईचे काम हाती घेऊन पुढील अनर्थ टाळावा, अशी मागणी पुढे येत आहे.